हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:59 IST2026-01-14T19:58:26+5:302026-01-14T19:59:29+5:30
घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
हजारीबाग- झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात बुधवारी भीषण स्फोटाची घटना घडली. हबीबीनगर परिसरात झाडे-झुडपे साफ करण्याचे काम सुरू असताना जमिनीत पुरुन ठेवलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत मो. सद्दाम, परवीन आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी हजारीबाग सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
झुडपांमध्ये दडवलेला बॉम्ब
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, हबीबीनगर परिसरात झाडे-झुडपे आणि कचरा साफ करण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान फावडा किंवा इतर अवजारे जमिनीत लपवून ठेवलेल्या बॉम्बला लागल्याने जोरदार स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करुन जखमींना बाहेर काढण्यात आले. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
Hazaribagh, Jharkhand: A blast in Habibi Nagar, under Bara Bazar police jurisdiction, killed three people. Reports say the explosion occurred while clearing bushes. pic.twitter.com/7v6Hom9NG7
— IANS (@ians_india) January 14, 2026
पोलीस प्रशासनाने सांगितले की, बॉम्ब तिथे कसा आणि कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आला होता, याचा सखोल तपास सुरू आहे. बॉम्ब जुना होता की, अलीकडेच ठेवण्यात आला, याचाही शोध घेतला जात आहे. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
याआधीही या परिसरात स्फोट
विशेष म्हणजे, याच परिसरात 2016 साली रामनवमीच्या दंगलीदरम्यान बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा याच भागात बॉम्बस्फोट झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परिसरात कडक बंदोबस्त
घटनेनंतर हबीबीनगर आणि आसपासच्या भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. दोषींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.