isro says k sivan does not have a social media account | Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...
Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...

ठळक मुद्दे इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'डॉ. सिवन यांचे सोशल मीडियावर स्वत:चे कोणतेही व्यक्तिगत अकाऊंट नाही.''अधिकृत अकाऊंटखेरीज अन्य कोणत्याही अकाऊंटला ‘फॉलो’ करू नये.'

नवी दिल्ली : 'चांद्रयान 2' मोहिमेतील शेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरापासून दूर असतानाच हा तुटला. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम आहे. चांद्रयान -2 संदर्भात सोमवारी (9 सप्टेंबर) एक आनंदाची बातमी मिळाली. विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकं आहे अशी माहिती चांद्रयान मिशनशी संबंधित असणाऱ्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली. यानंतर आता इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

'चांद्रयान-2’ मोहिमेच्या प्रगतीविषयी माहिती देणारी ‘इस्रो’ व डॉ. के. सिवन यांच्या नावाने अनेक बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आली आहेत. यावरून लाखो लोकांची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यावर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने समाजमाध्यमांतील या बनावट अकाऊंटपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

'इस्रो'ने एका निवेदनात म्हटले की, आमचे अध्यक्ष डॉ. सिवन यांच्या फोटोसह त्यांच्या नावाने काही बनावट अकाऊंट्स गेले काही दिवस सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. डॉ. सिवन यांचे सोशल मीडियावर स्वत:चे कोणतेही व्यक्तिगत अकाऊंट नाही, असे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अकाऊंटवर त्यांच्या नावे टाकली जाणारी माहिती अधिकृत नाही. तसेच 'इस्रो' ची फेसबूक, ट्विटर व युट्यूबवर अधिकृत अकाऊंट आहेत पण ती कोणाच्याही व्यक्तिगत नावाने नाहीत. त्यामुळे या अधिकृत अकाऊंटखेरीज अन्य कोणत्याही अकाऊंटला ‘फॉलो’ करू नये.

इस्रोच्या कामगिरीचं अनेक देश कौतुक करत आहेत. चीनच्या नागरिकांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. तसेच हिंमत न हरता आपलं कार्य अशाच रितीने सुरू ठेवा असं म्हटलं आहे. चीनच्या सोशल मीडियावर भारताच्या चांद्रयान- 2 मोहिमेचं भरभरून कौतुक होत आहे.  चीनची सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सने एका युजरला कोट करत भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणताही देश जर अंतराळातील संशोधनात प्रगती करत असेल तर त्याचा आम्ही सन्मान करतो. चांद्रयानाच्या अ‍ॅटिट्यूड कंट्रोल थ्रस्टरवरील (ACT) नियंत्रण न झाल्यानेच संपर्क तुटला असावा अशी शक्यता चीनमधील एका शास्त्रज्ञाने व्यक्त केल्याचं देखील ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.

'इस्रो' चं 'नासा' कडूनही कौतुक झालं आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने कौतुक करताना म्हटले की, अवकाशातील कामगिरी कठीणच असते. चांद्रयान-2 मोहिमेत ‘इस्रो’ने केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे व त्याने आम्हालाही स्फूर्ती मिळाली आहे. नासाने म्हटले की, आपण दोघे मिळून सौरमंडळाचा आणखी शोध घेण्याची संधी मिळेल, याची आम्हाला आतुरतेने प्रतिक्षा आहे. 

इस्रोच्या अधिकाऱ्याने सोमवारी (9 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, 'विक्रमने हार्ड लँडिंग केलं आहे आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार विक्रम नियोजित स्थळाजवळ आहे. विक्रम तुटलेलं नाही आणि ते सुरक्षित आहे.' इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली आहे. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरलं असलं, तरीही ते स्वत:च्या पायावर उभं राहू शकतं. इस्रोला विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास भारताच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.

 

Web Title: isro says k sivan does not have a social media account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.