जेफ्री एपस्टीनच्या पीडितांमध्ये एका भारतीय महिलेचा समावेश?; अमेरिकन अधिकारी घेताहेत 'तिचा' शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:04 IST2026-02-18T09:52:39+5:302026-02-18T13:04:23+5:30
हे रेकॉर्ड ३० जानेवारी रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या मोठ्या दस्तऐवजांचा एक भाग आहेत. ज्यामध्ये तीस लाखांहून अधिक कागदपत्रे आहेत. या

जेफ्री एपस्टीनच्या पीडितांमध्ये एका भारतीय महिलेचा समावेश?; अमेरिकन अधिकारी घेताहेत 'तिचा' शोध
वॉश्गिंटन - जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या जेफ्री एपस्टीन फाईल्समधील नवीन कागदपत्रे समोर आली आहेत. या कागदपत्रांमधून एपस्टीनच्या पीडितांमध्ये एका भारतीय महिलेचाही समावेश असल्याचं उघड झाले आहे. अमेरिकन अधिकारी संबंधित महिलेला नुकसान भरपाई देण्यासाठी तिचा शोध घेत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१३ जानेवारी २०२० रोजीच्या एका अंतर्गत ईमेलमध्ये पीडितेला भारतात शोधण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख आहे. या पत्रव्यवहारात अधिकाऱ्यांना तिचा पत्ता आणि संपर्क तपशील मिळू शकल्यास भारतातील अमेरिकन दूतावासाशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “एपस्टीन बळी” या शीर्षकाच्या या ईमेलमध्ये अनेक सुधारणा आहेत, ज्यात प्रमुख वैयक्तिक माहिती ब्लॅक आउट करण्यात आली आहे. द पायोनियरच्या रिपोर्टनुसार, या संदेशात अधिकाऱ्यांनी भरपाई प्रक्रियेबद्दल माहिती शेअर केली. न्यूयॉर्क क्राइम व्हिक्टिम्स कॉम्पेन्सेशन स्कीमचा दाखला देत त्यात अर्ज प्रक्रियेसोबत एफबीआयकडे पाठवण्यासाठी कागदपत्रे समाविष्ट आहेत. पात्र व्यक्तींसाठी आपत्कालीन पीडित सहाय्य अंतर्गत थेरपी सत्रांसाठीचाही उल्लेख आहे.
या संदेशात भारतातील पीडितेचा संदर्भ येतो, त्यात म्हटलंय की, "भारतात असलेल्या व्यक्तीबद्दल. जर तुम्ही मला तिचा पत्ता आणि संपर्क माहिती मिळवू शकलात, तर मी तेथील दूतावासातील आमच्या सहकाऱ्यांशी समन्वय साधेन. तुमचे काही अतिरिक्त प्रश्न असल्यास कृपया मला कॉल करा असं म्हटलं आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये एपस्टीनचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर काही महिन्यांनी ही देवाणघेवाण झाली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याच्या मृत्यूला आत्महत्या म्हटलं आहे. या ईमेलमधील दोघांची नावे ब्लॅक आऊट करण्यात आली आहेत.
हे रेकॉर्ड ३० जानेवारी रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या मोठ्या दस्तऐवजांचा एक भाग आहेत. ज्यामध्ये तीस लाखांहून अधिक कागदपत्रे आहेत. या फायलींमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांमधील अंतर्गत संवाद, एपस्टीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देवाणघेवाण केलेले वैयक्तिक ईमेल आणि भारताशी संबंधित व्यवसाय, प्रवास आणि राजकीय संदर्भांशी संबंधित पत्रव्यवहार यांचा समावेश आहे. पीडितांच्या मदतीच्या संदर्भांव्यतिरिक्त नव्याने प्रसिद्ध झालेल्या सामग्रीमध्ये एपस्टीनच्या व्यापक व्यावसायिक आणि वैयक्तिक संवादांच्या संदर्भात भारताचा उल्लेख करणारे ईमेल आहेत. २०१४ मधील एक संवाद, जो आता उघड झालेल्या नोंदींचा भाग आहे. तो एपस्टीन आणि बिल गेट्स यांच्यातील भारत भेटीबद्दलच्या चर्चेचा संदर्भ देतो.