'इंदिरा गांधींनी वीर सावरकरांना महान व्यक्ती म्हटले होते', अमित शाहांचा राहुल गांधींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:49 IST2024-12-17T20:48:36+5:302024-12-17T20:49:59+5:30
'राहुल गांधी नेहमी वीर सावरकरांबाबत खोटं पसरवतात.'

'इंदिरा गांधींनी वीर सावरकरांना महान व्यक्ती म्हटले होते', अमित शाहांचा राहुल गांधींवर घणाघात
Amit Shah : संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत यावर चर्चा झाली. यादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत आपले मत मांडले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींवर जोरदार टीका केली. वीर सावरकरांबद्दल काँग्रेसने नेहमीच खोटे पसरवल्याचे शाहा म्हणाले.
भाजप सरकार प्रत्येक राज्यात 'समान नागरी कायदा' लागू करणार; अमित शाहांची स्पष्टोक्ती
शाह म्हणाले की, लोकसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने सावरकरांबद्दल जी वक्तव्ये केली, ती मी पुन्हा करू इच्छित नाही. सावरकरांच्या नावापुढे 'वीर' हा शब्द कोणत्याही सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने लावलेला नाही. त्यांच्या शौर्यामुळे 140 कोटी भारतीयांनी त्यांना वीर ही उपाधी दिली आहे. अशा देशभक्तासाठी अशाप्रकारची विधाने केली जातात. काँग्रेस अनेक वर्षांपासून सावरकरांबद्दल खोटे बोलत आहे. 1857 ते 1947, या स्वातंत्र्यलढ्यात एकाच जन्मात दोन जन्मठेपेची शिक्षा कोणाला झाली असेल, तर ते वीर सावरकर आहेत. देशाला मुक्त करण्यासाठी समुद्रात उडी मारण्याचे धाडस कोणात होते, तर ते वीर सावरकर आहेत, असे कौतुद्गार शाहांनी काढले.
इंदिरा गांधींनी सावरकरांना महान व्यक्ती म्हटले
अमित शाह पुढे म्हणतात, देशासाठी त्याग करणे, हे कोणत्याही कायद्याशी जोडले जाऊ शकते का? मला इंदिरा गांधींची दोन वाक्ये इथे सांगायची आहेत, ज्यात त्यांनी वीर सावरकरांचे महान व्यक्ती म्हणून वर्णन केले होते. दुसरे म्हणजे, त्यांनी श्री बखले यांना एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये सावरकरांना भारताचे असामान्य सुपुत्र म्हटले होते, असेही अमित शाहांनी यावेळी सांगितले.
संविधान दाखवण्याचा नाही, विश्वासाचा विषय
राज्यघटनेचा केवळ शब्दातच नव्हे, तर कृतीतूनही आदर केला पाहिजे. या निवडणुकीत एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. प्रचारसभांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हातात संविधान घेऊन दाखवले. संविधान फक्त हातात घेऊन दाखवण्याचा विषय नाही, तर त्यावर विश्वास ठेवण्याचा विषय आहे. संविधान दाखवून जनादेश घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान संविधानाच्या प्रत वाटल्या, पण त्या कोऱ्या होत्या, प्रस्तावनाही नव्हती. 75 वर्षांच्या इतिहासात राज्यघटनेच्या नावाखाली एवढी मोठी फसवणूक कुणीच केली नाही. तुम्ही संविधानाची खोटी प्रत घेऊन फिरत आहात, हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोकांनी तुमचा पराभव केला, अशी घणाघाती टीकाही अमित शाहांनी केली.
'संविधान फक्त दाखवण्याचा नाही, विश्वास ठेवण्याचा विषय', अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्ला
काँग्रेसवाले मुस्लिम धर्मासाठी स्वतंत्र कायदा आणण्याची भाषा करतात. मला काँग्रेसला विचारायचे आहे की, धर्मनिरपेक्ष राष्ट्रात सर्व धर्मांसाठी कायदा असावा की नाही? हे लोक 50 टक्क्यांहून जास्त आरक्षण देण्याची भाषा करतात. देशातील दोन राज्यांमध्ये तर त्यांनी घटनाबाह्य पद्धतीने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. दोन्ही राज्यात काँग्रेसची सत्ता असताना धर्माच्या आधारे आरक्षण दिले जात होते, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत भाजपचा एकही सदस्य आहे, तोपर्यंत आम्ही धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ देणार नाही, हे घटनाविरोधी आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.