भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:35 IST2025-07-03T09:31:20+5:302025-07-03T09:35:34+5:30
India Pakistan Conflict: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.

भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया हँडल्सवर पुन्हा बंदी घातली, यात शाहिद आफ्रिदी, मावरा होकेन, यमना जैदी, हानिया आमिर आणि फवाद खान यांसारख्या लोकप्रिय लोकांचा समावेश आहे. भारताने मंगळवारी पाकिस्तानी सेलिब्रिटींची अकाउंट अनब्लॉक केली होती. परंतु, एका दिवसानंतर पुन्हा त्यांची अकाउंट ब्लॉक करण्यात आली.
भारतात बुधवारी काही तासांसाठी पाकिस्तानी सेलिब्रिटींची सोशल मिडिया हँडल दिसू लागली. त्यामुळे भारताकडून बंदी उठवण्यात आली, असे समजले जात होते. परंतु, गुरुवारी सकाळी भारतीय इंस्टाग्राम वापरकर्त्यांना पाकिस्तानी सेलिब्रिटींची अकाऊंट सर्च केल्यानंतर हे अकाउंट भारतात उपलब्ध नाही, असा मेसेज दिसायला सुरुवात झाली.
दरम्यान, बंदी उठवण्याबाबत किंवा पुन्हा लागू करण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया हँडल्सवर कायमची बंदी घातली आहे की, ही कारवाई तात्पुरती आहे? हे अस्पष्ट आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींची सोशल मिडिया हँडल्सवर बंद घालण्यात आली होती. भारताच्या मोहिमेवर अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी टीका केली होती. त्यानंतर भारतात त्यांचे सोशल मिडिया हँडल्स ब्लॉक करण्यात आले. बुधवारी पुन्हा पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मिडिया हँडल्स दिसू लागल्याने भारतीय आश्चर्यचकीत झाले. सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा रंगली. मात्र, त्यानंतर भारताने पु्न्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घातली.