व्यापार, तंत्रज्ञान आणि दुर्मिळ खनिजांचा शस्त्राप्रमाणे वापर; नाव न घेता पीएम मोदींचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 20:00 IST2026-01-27T19:59:15+5:302026-01-27T20:00:48+5:30
India-EU Trade Deal: भारत आणि युरोपीय युनियनमध्ये आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला.

व्यापार, तंत्रज्ञान आणि दुर्मिळ खनिजांचा शस्त्राप्रमाणे वापर; नाव न घेता पीएम मोदींचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
India-EU Trade Deal: भारत आणि युरोपीय युनियन (EU) मधील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) आज(दि.27) अखेर शिक्कामोर्तब झाला. या महत्त्वाच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार आणि तंत्रज्ञानाच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर अप्रत्यक्ष टीका केली.
ट्रेड, टेक्नॉलॉजी आणि रेअर अर्थ मिनरल्सचा शस्त्राप्रमाणे वापर...
भारत-EU ट्रेड डीलवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जगभरात ट्रेड, टेक्नॉलॉजी आणि रेअर अर्थ मिनरल्स यांना शस्त्र म्हणून वापरले जात आहे. त्यांनी उद्योगजगताला आवाहन करत प्रश्न उपस्थित केला की, आपली बिझनेस कम्युनिटी एकत्र येऊन EVs, बॅटरी आणि चिप्ससारख्या क्षेत्रांत बाह्य अवलंबित्व कमी करू शकते का? आपण मिळून एक विश्वासार्ह पर्यायी सप्लाय चेन उभी करू शकतो का?
भारत-EU दरम्यान अभूतपूर्व समन्वय
India–EU Business Forum ला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पहिल्यांदाच EU चे नेते भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आले. भारत-EU मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा FTA पूर्ण झाला आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणावर CEO सोबत इंडिया-EU बिझनेस फोरम आयोजित झाला. हे सगळे जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्तींमधील अभूतपूर्व समन्वयाचे प्रतीक आहे.
10 वर्षांत व्यापार दुप्पट
पंतप्रधानांनी भारत–EU आर्थिक संबंधांवर प्रकाश टाकताना सांगितले की, आपले समान मूल्य आहेत, जागतिक स्थिरतेसाठी समान प्राधान्यक्रम आहेत आणि खुल्या समाजामुळे आपल्या लोकांमध्ये नैसर्गिक नाते आहे. याच भक्कम पायावर आपण भागीदारी नव्या उंचीवर नेत आहोत. गेल्या 10 वर्षांत भारत-EU व्यापार दुप्पट होऊन 180 अब्ज युरोपर्यंत पोहोचला आहे. भारतात 6,000 हून अधिक युरोपीय कंपन्या कार्यरत आहेत, तर भारताच्या 1,500 कंपन्या EU मध्ये व्यवसाय करत आहेत.
FTA म्हणजे व्यवसायासाठी सकारात्मक संदेश
जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जागतिक बिझनेसमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. प्रत्येक कंपनी आपली मार्केट स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिप नव्याने तपासत आहे. अशा काळात हा FTA बिझनेस जगतासाठी एक स्पष्ट आणि सकारात्मक संदेश देतो. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, उद्योगजगत या करारातून मिळणाऱ्या संधींचा पूर्ण लाभ घेईल.