मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:19 AM2023-12-12T11:19:11+5:302023-12-12T11:19:50+5:30

Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली.

How much has terrorism decreased during the Modi government? Amit Shah presented the statistics in Parliament | मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा अमित शाह यांनी या आकडेवारीच्या माध्यमातून केला. 

जम्मू काश्मीरशी संबंधित जम्मू-काश्मीर पुनर्गठन (संशोधन) विधेयक आणि जम्मू-काश्मीर आरक्षण (संशोधन) विधेयक ही दोन विधेयके सोमवारी राज्यसभेमध्ये पारित करण्यात आली. या विधेयकांवरील चर्चेवेळी अमित शाह यांनी सांगितले की, कलम ३७० ने जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घातले. तसेच दहशतवादाला जन्म दिला. आज कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला. 

अमित शाह यांनी चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांबाबत काही आकडेवारीही सभागृहासमोर ठेवली.  त्यांनी दावा केला की, मोदी सरकारच्या काळात काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. अमित शाह यांनी सांगितले की, २००४ ते २०१४ या काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ७ हजार २१७ घटना घडल्या. तर मागच्या दहा वर्षांमध्ये २ हजार १९७ दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. 

अमित शाह यांनी पुढे सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये २०१० मध्ये दगडफेकीच्या २ हजार ६५६ घटना घडल्या होत्या. मात्र यावर्षी दगडफेकीची एकही घटना घडली नाही. सन २०१० मध्ये दगडफेकीत ११२ जणांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी अशा प्रकारे एकही मृत्यू झालेला नाही. तसेच २०१० मध्ये पाकिस्तानकडून ७० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं. मात्र यावर्षी केवळ ६ वेळा शस्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.

सभागृहातील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादामुळे आतापर्यंत ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. १९९४ ते २००४ दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ४० हजार १६४ घटना घडल्या होत्या. तर २००४ ते २०१४ या काळात दहशतवादाच्या ७ हजार २१७ घटना घडल्या होत्या. तर मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१४ ते २०२३ पर्यंत दहशतवादाच्या सुमारे २ हजार घटना घडल्या आहेत, असे अमित शाह यांनी सांगितले. 

Web Title: How much has terrorism decreased during the Modi government? Amit Shah presented the statistics in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.