ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचं किती नुकसान झालं? अजित डोवाल म्हणाले,"झालेल्या नुकसानाचा एक फोटो तरी दाखवा’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:42 IST2025-07-11T13:41:41+5:302025-07-11T13:42:26+5:30
Operation Sindoor News: ऑपरेशन सिंदूरबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताला झालेल्या नुकसानाचा एक फोटो तरी दाखवा. या कारवाईत भारताचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, असं अजित डोवाल यांनी ठणकावून सांगितलं.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचं किती नुकसान झालं? अजित डोवाल म्हणाले,"झालेल्या नुकसानाचा एक फोटो तरी दाखवा’’
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने आगळीक केल्यावर पाकिस्तानी सैन्याच्या हवाई तळांना लक्ष्य करत मोठी हानी घडवून आणली होती. मात्र या कारवाईदरम्यान, भारतीय संरक्षण दलांना काही विमानं गमवावी लागली होती. तसेच त्यामध्ये बहुचर्चित राफेल लढाऊ विमानांचा समावेश होता, असा दावा पाकिस्तान, आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि भारतातील विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता. त्यानंतर भारतीय सैन्यदलांसोबतच आता भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी यांनीही मोठं विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय सैन्यदलांचं कुठलंही नुकसान झालं नाही, असं अजित डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले.
अजित डोवाल यांनी आयआयटी मद्रासमध्ये आपल्या व्याख्यानादरम्यान सांगितले की, ऑपरेशन सिंदूरबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताला झालेल्या नुकसानाचा एक फोटो तरी दाखवा. या कारवाईत भारताचं कुठलंही नुकसान झालेलं नाही.
अजित डोवाल पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान आणि वॉरफेअरमधील संबंध नेहमीच महत्त्वपूर्ण असतात. आम्हाला ऑपरेशन सिंदूरबाबत अभिमान आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही सीमेपलिकडील पाकिस्तानच्या नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यामध्ये सीमेलगतचं एकही ठिकाण नव्हतं. आम्ही सर्व लक्ष्यांवर अचून निशाणा साधला. तसेच आम्ही केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच नष्ट केले, असे अजित डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ही संपूर्ण कारवाई २३ मिनिटे चालली. यादरम्यान, भारताला झालेल्या नुकसानाचा एक तरी फोटो दाखवा. या कारवाईदरम्यान भारतात एक ग्लासही तुटलं नाही. परदेशी प्रसारमाध्यमांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी काही मोजके फोटो घेऊन पाकिस्तानमधील १३ हवाई तळांबाबतही काही बातम्या दिल्या. मात्र १० मे आधीचे फोटो आणि त्यानंतरचे पाकिस्तानच्या १३ हवाई तळांचे उपग्रहांनी टिपलेले फोटो पाहा म्हणजे सारं काही स्पष्ट होईल.