पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
By रवी टाले | Updated: September 30, 2025 07:30 IST2025-09-30T07:30:12+5:302025-09-30T07:30:34+5:30
मुळात पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे असे ठरले होते, तर हस्तांदोलन न करण्यातून, चषक न स्वीकारण्यातून आपण काय साध्य केले?

पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
रवी टाले
कार्यकारी संपादक,
लोकमत, अकोला
वादाने प्रारंभ झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा समारोपही अपेक्षेप्रमाणे वादानेच झाला आणि वाद मात्र समारोपानंतरही सुरूच राहिला! अंतिम सामना संपल्यानंतर चषक वितरण समारंभास तब्बल एखादा तास उशीर होण्याचा आणि त्यानंतरही विजेत्या संघास चषक दिलाच न गेल्याचा प्रसंग, केवळ क्रिकेटच नव्हे, तर इतर कोणत्याही क्रीडा प्रकाराने पहिल्यांदाच अनुभवला असावा!
आशिया चषक स्पर्धेत काही उत्कृष्ट वैयक्तिक आणि सांघिक कामगिरींची नोंद झाली असली, काही उत्कंठावर्धक सामने बघायला मिळाले असले तरी, ही स्पर्धा आठवणीत राहील, ती वादांसाठीच! भारताने स्पर्धेत सहभागी व्हावे की नको, या मुद्द्यापासून वादांनी स्पर्धेचा जो पिच्छा पुरवला, तो स्पर्धा संपल्यावरही सुटलाच नाही. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहूनही भारतीय संघाला चषकाविनाच जल्लोष करावा लागला. आता तर आशिया क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी चषकच पळविल्याचा आरोप होत आहे. म्हणजे आणखी काहीकाळ तरी हा विवाद सुरूच राहणार, हे स्पष्ट आहे.
स्पर्धा जवळ येताच, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सहभागी व्हावे की नको, हा मुद्दा तापायला लागला. गंमत म्हणजे भूमिकाही बदलल्या होत्या. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रीडाच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रात संबंधच नको, अशी सातत्याने भूमिका मांडणारे कोणत्या तरी अस्पष्ट नियमांवर बोट ठेवून, नाइलाजास्तव खेळावे लागेल, म्हणत होते, तर एरव्ही राजकारण व क्रीडा क्षेत्राची गल्लत करता कामा नये, अशी भूमिका घेणारे आशिया चषकावर बहिष्काराची भूमिका मांडत होते. आपण सोयीनुसार आणि दुटप्पी भूमिका कशा घेतो आणि बदलतो, हे यावरून स्पष्ट होते. मुळात द्विपक्षीय मालिका नको, तर बहुपक्षीय तरी का आणि जर बहुपक्षीय चालतात, तर द्विपक्षीय का नको, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही! शेवटी पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका नको. मात्र, बहुपक्षीय मालिकांत सहभागी होता येईल, या केंद्र सरकारच्या भूमिकेचा हवाला देत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ पाठवण्याचा निर्णय घेतला.
पहलगाम हल्ल्याच्या जखमा आणि त्यानंतरच्या `ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणी ताज्या असताना भारताने संघ पाठवायलाच नको, असा आवाज समाजमाध्यमांतून मोठा व्हायला लागल्यानंतर, भावना शांत करण्यासाठी भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाहीत, असा निर्णय झाला. पण, त्यातही एक गोम आहे. प्रथेनुसार, स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी ९ सप्टेंबरला कर्णधारांची पत्रकार परिषद झाली, तेव्हा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगासोबत हस्तांदोलन केले नाही. पण, नक्वींसोबत मात्र केले. रविवारी सामना संपल्यानंतर मात्र नक्वींकडून चषक न स्वीकारण्याची भूमिका घेण्यात आली. मुळात खेळायचेच होते, तर हस्तांदोलन न करण्यातून आपण काय साध्य केले?
जर आपल्या भावना एवढ्याच तीव्र होत्या, तर ‘पाकिस्तानचा सहभाग असलेल्या स्पर्धेत आम्ही सहभागी होणार नाही’, असे थेट ठणकावून सांगायला हवे होते. पाकिस्तानने दहशतवादास भारताच्या विरोधातील शस्त्र बनवल्यापासूनच हा गोंधळ सुरू आहे. भारताने सर्वप्रथम १९८६मधील दुसऱ्या आशिया चषक स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. त्या बहिष्कारामुळे भारताचे काय वाकडे झाले होते? मग यावेळीही स्पर्धेवर थेट बहिष्कारच का घातला नाही? पुढे मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तर भारत-पाक क्रिकेट संबंध पुरते रसातळाला गेले आणि बीसीसीआयला पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणे अनिवार्य झाले. त्यामुळे द्विपक्षीय क्रिकेट बंदच झाले. बहुपक्षीय स्पर्धांमध्ये मात्र पाकिस्तानचा सहभाग असूनही भारत खेळत आला आहे. यावेळी मात्र वाद टोकाला गेला आणि त्यातून बरेच कटू प्रसंग घडले.
मुळात द्विपक्षीय मालिका न खेळता बहुपक्षीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत सहभागी झाल्याने नेमके काय साध्य होते, हेच कळायला मार्ग नाही. भारताने बहुपक्षीय स्पर्धांवर बहिष्कार घातल्यास भारत क्रिकेट जगतात एकटा पडेल, हे स्पष्ट आहे. पण, अशा स्पर्धांतील पाकिस्तानसोबतच्या सामन्यांवर बहिष्कार घालायला काय हरकत आहे? आज भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ताकद एवढी मोठी आहे की, बहुपक्षीय स्पर्धांमध्ये किमान प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये उभय देश आमने-सामने येऊ नयेत, अशी तजवीज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नक्कीच करू शकते. बाद फेरीत उभय संघ समोरासमोर आलेच, तर आम्ही खेळणार नाही, ही भूमिका भारत नक्कीच घेऊ शकतो. त्यामुळे काही स्पर्धा भारताला जिंकता येणार नाहीत; पण, त्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाद करण्याची आज कोणाचीही बिशाद नाही. पाकिस्तान दहशतवाद सोडू शकत नाही, त्याचे शेपूट सरळ होऊ शकत नाही, हे एव्हाना पुरते स्पष्ट झाले आहे. मग आपण ते किती वेळा नळीत घालून बघायचे?