CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:05 IST2025-08-18T17:04:27+5:302025-08-18T17:05:05+5:30
१८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं.

CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
नवी दिल्ली - बिहारमधील SIR आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल गांधी यांच्या आरोपांचे खंडन करत पुढील ७ दिवसांत त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे अन्यथा देशाची माफी मागावी असं आव्हान केले. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी एकत्रित येत आयोगाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेससह समाजवादी पक्ष, टीएमसी, आरजेडी, आम आदमी पार्टी, शिवसेना ठाकरे गट यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर देत काही प्रश्नही उपस्थित केले आहे.
कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी म्हटलं की, मतदानाचा अधिकार सर्वात महत्त्वाचा आहे. भारतातील अनेक राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत. ज्याचे उत्तर निवडणूक आयुक्त देत नाहीत. ते त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत. काल जी पत्रकार परिषद ECI ने घेतली ती आम्ही पाहिली, ज्यांना विरोधी पक्षांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती, तेच राजकीय पक्षांवर प्रश्न विचारत टीका करत होते असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोग पोलिंग बूथवरील सीसीटीव्हीवर गप्प होता, १ लाख बोगस मतदारांवर काही उत्तर दिले नाही. निवडणूक आयोगाने हे प्रायव्हेसी उल्लंघन कसे हे सांगायला हवे. निवडणूक आयोगावर दबाव आहे. बिहारमध्ये गडबडीत SIR का केले जात आहे? निवडणूक आयोग प्रश्नांपासून पळत आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व गोष्टी सुप्रीम कोर्टाने नाकारल्या आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर आरोप केले आहेत असंही काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.
दरम्यान, निवडणूक आयोगाने वारंवार सांगतंय, जे आरोप केले जात आहेत त्यांनी प्रतिज्ञापत्रे दिली पाहिजेत, परंतु जेव्हा अखिलेश यादव यांनी २०२२ मध्ये प्रतिज्ञापत्र दिले तेव्हा काही कारवाई झाली का? कोणतीही कारवाई झाली नाही. अखिलेश यादव यांनी २०२२ च्या निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र दिले होते की सपा समर्थकांची मते मोठ्या प्रमाणात कापली जात आहेत, १८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं.