काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:52 IST2025-12-01T12:51:40+5:302025-12-01T12:52:33+5:30
रेल्वे स्टेशनच्या फुटओव्हर ब्रीजजवळ मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला आपला जीव गमवावा लागला.

AI Generated Image
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ एका हृदयद्रावक घटनेने हादरली आहे. चारबाग रेल्वे स्टेशनच्या फुटओव्हर ब्रीजजवळ एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला आपला जीव गमवावा लागला. ४० वर्षीय संगीता रावत या आपल्या तीन मुलांसोबत रस्ता पार करत असताना ही घटना घडली. भरधाव आलेल्या रोडवेज बसने त्यांना चिरडले आणि त्यांच्या तीन निरागस लेकरांसमोरच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रस्त्यावर उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले.
मुलाने हात सोडला, आई धावली अन्..
रविवारच्या सकाळी ही दुर्घटना घडली. संगीता रावत या आपल्या ७ वर्षांचा लहान मुलगा आदी, १२ वर्षांची जाह्नवी आणि १७ वर्षांचा मोठा मुलगा राहुल यांच्यासह रस्ता ओलांडत होत्या.
मोठा मुलगा राहुल याने रडत रडत सांगितले की, "मी जाह्नवीचा हात धरला होता आणि आईने आदीचा हात धरला होता. आम्ही रस्ता ओलांडत असताना आदीने आईचा हात सोडला आणि तो अचानक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळू लागला. आईने त्याला 'आदी थांब!' अशी हाक मारली आणि जीवाची पर्वा न करता त्याला वाचवण्यासाठी त्या बसच्या दिशेने धावली."
राहुलने पुढे सांगितले की, त्याने येणाऱ्या रोडवेज बसला थांबवण्याचा इशारा केला होता. पण अचानक त्याने बसचा वेग वाढला. आदी वाचला, पण संगीता रावत या चारबाग डेपोच्या भरधाव बसखाली आल्या. त्यांच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पतीच्या निधनानंतर मिळाली होती नोकरी
संगीता रावत या कानपूर नगर निगममध्ये 'हेड क्लर्क' म्हणून कार्यरत होत्या. २०२२ मध्ये त्यांचे पती सुनील कुमार यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांना 'मृतक आश्रित कोट्यातून' ही नोकरी मिळाली होती. पतीच्या निधनानंतर त्या एकट्यानेच राहुल, जाह्नवी आणि आदी या तीन मुलांचा सांभाळ करत होत्या. बहिणीच्या घरून परतत असताना त्यांचा हा अपघात झाला.
संतप्त जमावाने चालकाला चोपले!
अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संगीता यांना लोकांनी आणि पोलिसांनी तत्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर बस चालक मुकेश कुमार सैनी बस सोडून पळून जाऊ लागला. हे पाहून संतप्त झालेल्या जमावाने त्याला पकडले आणि बेदम चोप दिला. हुसैनगंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि त्याला ताब्यात घेतले. चालकावर भादंवि ३०४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हुसैनगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी शिवमंगल सिंह यांनी दिली.
पतीच्या निधनानंतर संगीता या तीन मुलांसाठी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावत होत्या. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. आईच्या अपघाती मृत्यूने आता या तीन अनाथ मुलांवर आभाळ कोसळले आहे.