जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:37 IST2026-04-29T11:37:11+5:302026-04-29T11:37:42+5:30
Madhya Pradesh News: एखादा अपघात, दुर्घटना घडल्यानंतर पीडितांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अगतिकचे फायदा घेतल्याच्या घटना आपल्याकडे अनेकदा घडतात. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना मध्य प्रदेशमधील कटनी येथे घडली आहे.

जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
एखादा अपघात, दुर्घटना घडल्यानंतर पीडितांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अगतिकचे फायदा घेतल्याच्या घटना आपल्याकडे अनेकदा घडतात. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना मध्य प्रदेशमधील कटनी येथे घडली आहे. येथे एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपाचारांसाठी रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका चालकाने पैशांची मागणी केली. एवढंच नाही तर रुग्णवाहिका घाण झाल्याने ती रुग्णाच्या पत्नीकडून स्वच्छ करून घेतली. या घटनेचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत कटनी जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जनी १०८ रुग्णवाहिकेच्या चालकाला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मध्य प्रदेशमधील कटनी जिल्ह्यातील करेलाजवळ झालेल्या अपघातात राहुल बर्मन नावाचा ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. त्याता उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातील प्राथमिक उपचारांनंतरही त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारांसाठी त्याला जबलपूर येथे नेण्यास सांगितले. यादरम्यान, कटनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या मोहित नावाच्या चालकाने या रुग्णांच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तन केलं. त्याच्या या कृत्याचा व्हिडीओ कुणीतरी चित्रिक करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला रुग्णवाहिका स्वच्छ करताना दिसत आहे. तर तिथे उपस्थित असलेला कर्मचारी हे सर्व पाहताना दिसत आहे. या घटनेमुळे १०८ रुग्णवाहिकेसारख्या जीवनरक्षक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोबतच आरोग्य व्यवस्थेमधील संवेदनहीनताही समोर आणले आहे.