ग्लोबल एअर अहवाल : भारतात २०१९ मध्ये १.१६ लाख नवजात दगावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:02 IST2020-10-22T03:58:06+5:302020-10-22T07:02:47+5:30
अमेरिकास्थित हेल्थ इफ्टेक्स् इन्स्टिट्यूट अँड ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजने पहिल्यांदाच अत्याधिक वायू प्रदूषणाचा नवजात बालकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उपखंडनिहाय विश्लेषणात्मक अहवाल जारी केला आहे.

ग्लोबल एअर अहवाल : भारतात २०१९ मध्ये १.१६ लाख नवजात दगावली
नवी दिल्ली : वायू प्रदूषणाच्या जीवघेण्या परिणामांच्या भयानक वास्तवाकडे लक्ष वेधताना ग्लोबल एअर २०२० च्या अहवालातून वायू प्रदूषण वेळीच नियंत्रित न केल्यास मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत गंभीर इशारा दिला आहे. या अहवालानुसार २०१९ मध्ये वायू प्रदूषणामुळेभारतात १,१६००० नवजात बालके जन्मानंतर महिनाभरात दगावली. नायजेरिया, पाकिस्तान, इथोपिया आणि डेमॉक्रॅटिक ऑफ कांगोपेक्षाही भारतातवायू प्रदूषणामुळे नवजात बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.
अमेरिकास्थित हेल्थ इफ्टेक्स् इन्स्टिट्यूट अँड ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजने पहिल्यांदाच अत्याधिक वायू प्रदूषणाचा नवजात बालकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उपखंडनिहाय विश्लेषणात्मक अहवाल जारी केला आहे.
ग्लोबल एअरच्या अध्ययनानुसार वायू प्रदूषणाचा गर्भवती मातेवर होणाऱ्या परिणामांमुळे ३७ आठवड्यांपूर्वी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे वजन २५०० ग्रॅम असते. जन्मत: वजन कमी असल्याने श्वसनमार्गात होण्याची, तसेच अतिसारासोबत कावीळ व अन्य गंभीर संसर्ग होण्याची जोखीम असते. यामुळे मृत्यू होऊ शकतो. गर्भवती मातेवर वायू प्रदूषणाचा परिणाम होत असला तरी यामागची जीवशास्त्रीय कारणे पूर्णत: माहीत नाहीत. गर्भवाढ होताना वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम तंबाखू सेवन, धूम्रपानासारखेच असतात. तंबाखू सेवन, धूम्रपान हे मुदतपूर्व जन्म आणि जन्मत: वजन कमी असण्यामागचे घटक आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन (आयसीएमआर) केंद्राच्या संचालक (वायूगुणवत्ता, हवामान आणि आरोग्य प्रगत संशोधन) कल्पना बालकृष्णन यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार वायूगुणवत्ता राखल्यास भारतातील १,१६,००० नवजात बालकांचा मृत्यू टाळता येऊ शकला असता. आयसीएमआरसह ७० संस्थांनी केलेल्या अध्ययनानुसार घरगुती आणि वायू प्रदूषणाचा गरोदरपणात विपरीत परिणाम होतो.
५० टक्के नवजात बालकांचा मृत्यू घराबाहेरील वायू प्रदूषणामुळे झाला. वायू प्रदूषणाचा मानवावर घातक परिणाम होत असताना जगभरातील अनेक देशांनी वायू प्रदूषण कमी करण्याकामी फारसे काम केलेले नाही.
वायू प्रदूषणामुळे उपसहारा विभागात 2.36.000 नवजात बालकांचा मृत्यू झाला. यात भारतत - 1.16.000, पाकिस्तानात - 56.500, नायजेरियात - 67.900, इथोपियामध्ये - 22.900, तर कांगो मध्ये - 1,200 नवजात बालकांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.