देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:05 IST2026-03-18T20:03:02+5:302026-03-18T20:05:09+5:30
Fuel Crisis in India: पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले.

देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती
Fuel Crisis in India: मध्यपूर्वेतील तणावामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' मार्गे होणाऱ्या जहाज वाहतुकीत व्यत्यय आल्यामुळे भारतातील इंधन आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी बुधवारी (१८ मार्च) आयोजित पत्रकार परिषदेत या पुरवठ्याच्या सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. कच्च्या तेलाचा (क्रूड ऑइल) पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी या वेळी अधोरेखित केले. तसेच, घरगुती एलपीजीच्या उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Delhi: Sujata Sharma, Joint Secretary (Marketing & Oil Refinery), Ministry of Petroleum & Natural Gas, says, "We have sufficient stocks of aviation turbine fuel and no price increase has been done by the oil marketing companies...Till now, there has been no increase in… pic.twitter.com/zk4KZR6li0
— ANI (@ANI) March 18, 2026
मीडियाशी संवाद साधताना सुजाता शर्मा म्हणाल्या, कोणत्याही किरकोळ विक्री केंद्रांवर किंवा एलपीजी वितरक केंद्रांवर तुटवडा निर्माण झालेला नाही. घरगुती वापराचे PNG आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे CNG, या दोन्हीसाठी १०० टक्के पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. मात्र, एलपीजीच्या संदर्भातील परिस्थिती मात्र अजूनही चिंतेचा विषय बनलेली आहे. घरगुती एलपीजी ग्राहकांना पुरवठा करण्याला सध्या प्राधान्य देण्यात आले आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सची विक्री आता अंशतः पुन्हा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Delhi: Sujata Sharma, Joint Secretary (Marketing & Oil Refinery), Ministry of Petroleum & Natural Gas, says, "More than 2300 surprise inspections carried out by OMCs on LPG distributors yesterday." pic.twitter.com/N3J8Sr9epq
— ANI (@ANI) March 18, 2026
त्या पुढे म्हणाल्या, आमच्याकडे 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'चाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. या तणावपूर्ण परिस्थितीतही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. राज्य सरकारांनी जर एलपीजीकडून PNG कडे होणारा दीर्घकालीन बदल (संक्रमण) सुलभ करण्यास मदत केली, तर त्यांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त १० टक्के कोटा (वाटप) दिला जाईल, असे पत्र केंद्र सरकारने राज्यांना पाठवले आहे, असेही सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले.