बेळगावातील चडचण बँक दरोडाप्रकरणी चौघांना अटक; ९ किलो सोने, ८६ लाखांहून अधिक रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:12 IST2025-10-10T16:11:34+5:302025-10-10T16:12:35+5:30
महाराष्ट्रातील एकाचा समावेश :तिघे बिहारचे

बेळगावातील चडचण बँक दरोडाप्रकरणी चौघांना अटक; ९ किलो सोने, ८६ लाखांहून अधिक रोकड जप्त
शिरगुप्पी (जि. बेळगाव) : चडचण (जि. विजापूर) येथील एसबीआय बँकेवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या दरोड्यात बेकायदेशीर शस्त्रे पुरवणाऱ्या महाराष्ट्रातील एकास व बिहारमधील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आतापर्यंत या दरोड्यातील ९.०१ किलो सोने आणि ८६ लाख ३१ हजार २२० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) आर. हितेंद्र यांनी गुरुवारी विजयपूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
१६ सप्टेंबर रोजी दुपारी बुरखा घातलेले तीन अज्ञात दरोडेखोर खाते उघडण्याच्या बहाण्याने एसबीआय बँकेत घुसले. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून बांधले. स्ट्राँग रूममधील १.०४ कोटी रुपये व सुमारे २० किलो सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत २० कोटी रुपये) लुटून ते पसार झाले होते. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निम्बर्गी यांनी सात विशेष तपास पथके स्थापन करून वेगाने तपास सुरू केला होता.
महाराष्ट्रात अटक केलेला मुख्य संशयित आरोपी (नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.) हा दरोड्यापूर्वी अनेक वेळा बँकेत फिरकला होता. त्याने बँकेच्या आत-बाहेरील परिसर तपासून ठाव घेतला होता. त्याने मंगळवेढा येथून चोरी केलेल्या मोटारीचा वापर गुन्ह्यात केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला ७ ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची पोलीस कोडडीत रवानगी करण्यात आली अाह. पोलिसांनी त्याच्याकडून ५५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. तसेच शस्त्रपुरवठा करणाऱ्या बिहारमधील तिघांना अटक केली आहे.
बिहारमधील तिघांकडून शस्त्रपुरवठा
दरोडा प्रकरणात, आरोपींना बेकायदेशीर पिस्तुले पुरविणारे बिहार राज्यातील समस्तीपूर येथील राकेश कुमार सहानी (२२), राजूकुमार पासवान (२१) आणि रक्षककुमार महातो (२१) या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलिस कोठडी मिळाली आहे.