माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:09 IST2026-01-12T18:07:40+5:302026-01-12T18:09:14+5:30
Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
Jagdeep Dhankhar: देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धनखड गेल्या आठवड्यात दोनदा बेशुद्ध पडले, ज्यानंतर त्यांना सोमवारी दिल्लीतल्या AIIMSमध्ये दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, विविध तपासण्या केल्या जात आहेत.
वॉशरुममध्ये बेशुद्ध पडले
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड 10 जानेवारी रोजी वॉशरुममध्ये दोनदा बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने त्यांना AIIMSमध्ये नेण्यात आले. आज त्यांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
यापूर्वीही अनेकदा भोवळ आलेली
धनखड यापूर्वीही अनेक वेळा बेशुद्ध/भोवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात कच्छचे रण, उत्तराखंड, केरळ आणि दिल्ली येथील विविध कार्यक्रमांसा समावेश आहे. या घटना त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान घडल्या होत्या. याच आरोग्य कारणास्तव त्यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा
21 जुलै 2025 रोजी संसदचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. पहिल्या दिवशी राज्यसभेचे सभापती म्हणून धनखड यांनी दिवसभर सभागृहाची कार्यवाहीही चालवली होती. मात्र त्याच रात्री उपराष्ट्रपतींच्या अधिकृत ‘X’ खात्यावरून त्यांचा राजीनामा जाहीर झाला. या अचानक राजीनाम्यावर विरोधक आणि अनेक राजकीय विश्लेषकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आरोग्यापलीकडेही काही कारणे असावीत, अशी चर्चा तेव्हा रंगली होती.
सरकारी निवासासाठी पत्रव्यवहार
अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, राजीनामा दिल्यानंतर पाच महिने उलटूनही माजी उपराष्ट्रपतींना सरकारी निवास मिळाले नव्हते. 22 ऑगस्ट रोजी त्यांनी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून, माजी उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या अधिकृत निवासाची मागणी केली होती.
माजी उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधा
भारत सरकारकडून माजी उपराष्ट्रपतींना दरमहा ₹2 लाख पेन्शन, टाइप-8 बंगला (सरकारी निवास), एक खाजगी सचिव व एक अतिरिक्त खाजगी सचिव, खाजगी सहाय्यक, डॉक्टर व नर्सिंग अधिकारी आणि चार वैयक्तिक सहाय्यक मिळतात. तसेच, माजी उपराष्ट्रपतींच्या निधनानंतर त्यांच्या पती/पत्नीला टाइप-7 निवास उपलब्ध करून दिला जातो.