हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:56 IST2025-05-13T09:54:30+5:302025-05-13T09:56:00+5:30
हिंडन विमानतळावरून मंगळवारी बंगळुरू, किशनगड, लुधियाना, आदमपूर आणि नांदेडसाठी उड्डाणे सुरू होत आहेत...

हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
उत्तर प्रदेशातील हिंडन विमानतळावरून आजपासून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर, हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व विमानतळांवरील विमानसेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती. ती आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. हिंडन विमानतळावरून मंगळवारी बंगळुरू, किशनगड, लुधियाना, आदमपूर आणि नांदेडसाठी उड्डाणे सुरू होत आहेत.
याशिवाय, हिंडन विमानतळावरून मुंबईसाठीची विमानसेवा 14 मेपासून सुरू होईल. तसेच, गोवा, कोलकाता, वाराणसी, पाटणा, भुवनेश्वर, चेन्नई, जयपूर सारख्या शहरांसाठीची विमानसेवा 15 मेपासून सुरू केली जाईल. सध्या हिंडन एअरपोर्टवरून एअर इंडिया एक्सप्रेस, फ्लाय बिग आणि स्टार एअर वे द्वारे सेवा पुरवली जाते.
एअर इंडिया, इंडिगोकडून श्रीनगर-चंदीगडसह अनेक शहरांची विमानसेवा रद्द -
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरी, या दोन्ही देशांतील तणाव लक्षात घेत एअर इंडिया आणि इंडिगोने एक मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांनी मंगळवारसाठी काही महत्वाच्या शहरांतील विमानसेवा रद्द केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत चंदीगड आणि राजकोटसह काही शहरांतील विमानसेवा रद्द करण्यात आली असल्याचे इंडिगोने म्हटले आहे. तसेच एअर इंडियानेही विमानसेवा रद्द केल्यासंदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.
इंडिगोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर विमानसेवा रद्द केल्यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्यात, 'आमच्यासाठी आपली सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. 13 मेसाठी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे आपले प्रवासाचे नियोजन विस्कळीत होईल, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आमची टीम परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहे. आपल्याला लवकरच अपडेट देण्यात येईल."
एअर इंडियाकडून आठ शहरांची विमानसेवा रद्द -
एअर इंडियाने राजस्थान, जम्मू काश्मीर आणि गुजरातसह आणखी काही राज्यांची विमानसेवा रद्द केली आहे. त्यांनी एक्सवर म्हटले आहे, 'ताज्या घडामोडी लक्षात घेत आणि तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथील विमानसेवा (येणारी आणि जाणारी) मंगळवार, 13 मेसाठी रद्द करण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आपल्याला अपडेट देत राहू.'