'Fast tag' on toll knots on National Highway from 1st December | १ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘फास्ट टॅग’
१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘फास्ट टॅग’

मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे टोल नाक्यांवर अनेक वेळा रांगेत तिष्ठत राहावे लागते. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाया जातो, ते टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनधारकांसाठी ‘फास्ट टॅग’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगाऊ स्वरूपात, ऑनलाइन, कॅशलेस टोल भरणाऱ्या वाहनांना स्वतंत्र मार्गिकेतून कुठल्याही अडथळ्याविना बाहेर पडता येईल.१ नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जात असून येत्या १ डिसेंबरपासून तो नियमित स्वरूपात कार्यान्वित केला जाणार आहे.

या उपक्रमामुळे वाहनधारकांचा वेळ, पैशांची मोठी बचत होणार असल्याचा दावा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला. प्राधिकरणाचे विभागीय मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंग यांनी सांगितले की, सर्व टोल नाक्यांवर तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आणि विविध बॅँकांमध्ये ऑनलाइन रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वाहनांना ‘फास्ट टॅग’ दिला जाईल. गाडीच्या पुढील दर्शनी भागावर तो लावायचा असून त्याची नोंदणी टोल नाक्यावरून पास होताना तेथील मशीनद्वारे स्वतंत्रपणे होईल. त्यामुळे अडथळ्याविना गाडी पुढे निघून जाईल.

प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासून हा उपक्रम सुरू होईल. त्यासाठीच्या कार्डसाठी अनामत रक्कम म्हणून किमान शंभर रुपये शुल्क घेतले जात असून शुक्रवारपासून ३० नोव्हेंबरपर्यंत मोफत नोंदणी करून घेतली जाईल. वाहनधारकांना किमान ५०० रुपये आणि त्याहून कितीही रक्कम आगाऊ टोलच्या स्वरूपात भरता येईल. १ डिसेंबरपासून अनामत रक्कम ५०० रुपये होईल. रक्कम भरण्याची सुविधा सर्व टोल नाके, प्राधिकरणाचे संकेतस्थळ आणि सहा बॅँकांमध्ये आहे. मोबाइलवर रक्कम भरण्यासाठी ‘माय फास्ट टॅग’ हे अ‍ॅपही आहे. या सुविधेचा वापर करणाºयांना नियमित टोल दरात अडीच टक्के सवलत मिळेल, ही रक्कम त्यांच्या कार्डवर जमा होत राहील. एक कार्ड साधारण पाच वर्षे वापरता येईल. काही महिन्यांनंतर राज्य सरकारकडून राज्य महामार्गावरही अशा पद्धतीने टोल भरण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे सिंग यांनी सांगितले. या सुविधेबरोबरच पूर्वीप्रमाणे ‘ईटीसी’द्वारे रोख अथवा एटीएमद्वारे टोल वसुलीही सुरू राहील, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.

‘फास्ट टॅग’मध्ये शुल्क न भरता घुसखोरी केल्यास दुप्पट वसुली
‘फास्ट टॅग’च्या मार्गिकेसाठी शुल्क न भरता त्या ‘लेन’मध्ये प्रवेश करणाºया वाहनांकडून दुप्पट वसुली केली जाईल. त्याबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारने जारी केला आहे. त्यामुळे या मार्गिकेचा वापर केवळ आगाऊ स्वरूपात रक्कम जमा करणाºयांना करता येईल.

पश्चिम विभागांतर्गत १९ टोल नाके
राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम विभागीय कार्यालयांतर्गत पुणे-बंगळुरू, मुंबई-गोवा, सोलापूर हे महामार्ग येत असून त्यामध्ये सरासरी ३५०० किलोमीटर मार्ग आहे. त्यापैकी १८०० किमी मार्गावर प्रकल्प सुरू असून उर्वरित मार्गावर विविध प्रकल्प राबविले जातील. याअंतर्गत एकूण १९ टोलनाक्यांचा समावेश आहे. त्यापैकी १५ ठिकाणी ‘ईटीसी’द्वारे टोल घेतला जातो. १ डिसेंबरपासून सर्व १९ टोलनाक्यांवर ‘फास्टटॅग’ सुविधा कार्यान्वित केली जाईल.

Web Title: 'Fast tag' on toll knots on National Highway from 1st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.