निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 05:50 IST2025-08-18T05:50:04+5:302025-08-18T05:50:18+5:30
"महाराष्ट्रात एक कोटी नवे मतदार जादूने तयार"

निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
सासाराम (बिहार) : बिहार विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांच्या आडून मतांची चोरी करण्याचा डाव आखला जात आहे. मात्र विरोधी पक्ष कोणत्याही परिस्थितीत ‘निवडणूक चोरी’ होऊ देणार नाही. निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून संपूर्ण देशात मतांची चोरी करीत असल्याचे आता लपून राहिले नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बिहारमधून मतचोरीच्या विरोधात ‘मतदार हक्क यात्रा’ प्रारंभ केली. त्यावेळी त्यांनी हा निर्धार व्यक्त केला.
राहुल गांधी म्हणाले की, ही संविधान वाचविण्याची लढाई आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप संविधान संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मतदारसंख्येतील वाढीचा दाखला देत दावा केला की, सर्व नवे मतदार भाजपकडे गेले. तसेच बेंगळुरूतील महादेवपुरा मतदारसंघातील मतदार याद्यांतील घडामोडींचा उल्लेख त्यांनी केला.
भाजपच्या लोकांकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र आयोगाने का मागितले नाही, असा सवाल राहुल यांनी केला.
कोण काय म्हणाले?
महाराष्ट्रातील एक्झिट पोल चाचण्या सांगत होत्या की, इंडिया आघाडी निवडणुका जिंकेल. लोकसभेत इंडिया आघाडी जिंकते; पण चार महिन्यांत आपण त्याच भागात हरतो. जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळले की एक कोटी नवीन मतदार जादूने तयार झाले आहेत.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
संविधान धोक्यात आहे, भाजप सत्तेत असेपर्यंत लोकांचे अधिकार सुरक्षित नाहीत. आयोग केंद्र सरकारचा एजंट झाले आहे. २०२३ मध्ये सरकारने असा कायदा केला की, आयोगातील सदस्यांनी गडबड केली, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
देशातील सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. यावेळी भाजपला कोणत्याही किमतीत सत्तेत येऊ देऊ नये. सर्वांनी एकत्र येऊन भाजपला हाकलून लावावे, जेणेकरून आपली लोकशाही मजबूत होईल.
- लालूप्रसाद यादव, अध्यक्ष, राजद
लोकशाहीची जननी बिहारमधून लोकशाही संपू दिली जाणार नाही. ही मतचोरी चनाही, तर हा एक भलामोठा दरोडा आहे.
-तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते