Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्यामुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज(दि.२०) सकाळी जनसुनावणीदरम्यान हल्ला झाला. या हल्ल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सीएम गुप्ता यांनी हा केवळ त्यांच्यावर झालेला हल्ला नसून, जनतेच्या समस्या सोडवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर झालेला 'भ्याड प्रयत्न' असल्याचे म्हटले आहे.
सीएम रेखा गुप्ता यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, "आज सकाळी सार्वजनिक सुनावणीदरम्यान माझ्यावर झालेला हल्ला हा केवळ माझ्यावरच नाही, तर दिल्लीची सेवा करण्याच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या आमच्या संकल्पावर हल्ल्याचा भ्याड प्रयत्न आहे. स्वाभाविकच, या हल्ल्यानंतर मला धक्का बसला होता, परंतु आता मी ठीक आहे. माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करते की, कृपया मला भेटण्याची तसदी घेऊ नका. मी लवकरच तुमच्यामध्ये काम करताना दिसेन."
"अशा हल्ल्यांमुळे जनतेची सेवा करण्याचा माझा उत्साह आणि संकल्प कधीही मोडू शकत नाही. आता मी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा आणि समर्पणाने तुमच्यामध्ये असेन. सार्वजनिक सुनावणी आणि सार्वजनिक समस्यांचे निराकरण पूर्वीप्रमाणेच गांभीर्याने आणि वचनबद्धतेने सुरू राहील. तुमचा विश्वास आणि पाठिंबा ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्या अपार प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी मनापासून आभार मानते," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हल्ला कसा झाला?आज सकाळी ८:१५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यांच्या 'जन सुनवाई' कार्यक्रमात जनतेच्या तक्रारी ऐकत होत्या. वातावरण सामान्य होते. यादरम्यान, राजेशभाई खिमजी नावाचा व्यक्ती त्याची फाईल्स घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर पोहोचला. सुरुवातीला तो सामान्य तक्रारदारासारखा वाटत होता, परंतु अचानक त्याने मुख्यमंत्र्यांचा हात धरुन त्यांना खेडण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई केली आणि आरोपीला पकडले.
आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखलआरोपी राजेशविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१)/१३२/२२१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी बीएनएसच्या कलम १३२, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल कलम २२१ आणि हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी राजेशभाई खिमजीवर आधीच ५ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ३ गुन्हे दारू तस्करीशी संबंधित आहेत, तर २ गुन्हे हल्ल्याशी संबंधित आहेत. काही प्रकरणांमध्ये तो निर्दोष सुटला आहे. दिल्ली पोलिस आता त्याच्या संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करत आहेत.