Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:16 IST2025-11-28T14:15:52+5:302025-11-28T14:16:46+5:30
Cyclone Ditva Update: श्रीलंकेत 'दितवाह'ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत.

Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
शेजारील देश श्रीलंकेमध्ये मोठी हानी केल्यानंतर 'दितवाह' नावाचे भयानक चक्रीवादळ आता भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुद्दुचेरीसह काही राज्यांसाठी 'प्री-सायक्लोन' अलर्ट जारी केला आहे.
श्रीलंकेत 'दितवाह'ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत. गेल्या २४ तासांत ३०० मिमी पेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाला आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या, पुराच्या घटना घडल्या आहेत. ४३,९९१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. श्रीलंकेतील शाळा बंद करण्यात आल्या, रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. तर कोलंबो स्टॉक एक्स्चेंजमधील व्यवहारही लवकर थांबवावे लागले आहेत. श्रीलंकेतील परिस्थिती बिघडल्यास, त्यांची विमाने दक्षिण भारतातील त्रिवेंद्रम (Trivandrum) किंवा कोचीन विमानतळांवर वळवली जाऊ शकतात, असेही स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ आता श्रीलंकेच्या किनाऱ्यावरून हळूहळू भारताच्या दिशेने सरकत आहे. हवामान विभागाने पुढील १२ तासांत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. चक्रीवादळाचा धोका प्रामुख्याने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या किनारपट्टीवर आहे. या भागांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत हवामान अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे.