कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 20:10 IST2025-08-15T19:40:29+5:302025-08-15T20:10:24+5:30
Karnataka News: विविध कारणांमुळे कर्नाटकचं राजकारण चर्चेत असतानाच आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याविरोधात बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.

कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई
विविध कारणांमुळे कर्नाटकचं राजकारण चर्चेत असतानाच आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचेआमदार सतीश कृष्णा सैल यांच्याविरोधात बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसचेआमदार सतीश कृष्णा सैल यांच्याशी संबंधित चार राज्यातील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहे. ही ठिकाणी कर्नाटक, गोवा, मुंबई आणि दिल्ली येथील मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीदरम्यान, १.६८ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ६.७ किलो सोनं सापडलं आहे. हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कोट्यवधीची रोख रक्कम आणि सोन्यासह या छापेमारीमधून अनेक कागदपत्रेही हाती लागली आहेत. याशिवाय ईडीने १४.१३ कोटी रुपयांची रक्कम असलेली बँक खातीही गोठवली आहे. हे संपूर्ण प्रकरण काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याशी संबंधित व्यवसाय आणि कंपन्यांशी संबंधित आहे. सतीश सैल यांना बेकायदेशीर लोहखनिजाच्या निर्यातीप्रकरणी आधीच दोषी ठरवण्यात आले होते.
हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकच्या लोकायुक्तांकडून २०१० साली करण्यात आलेल्या एका तपासाशी संबंधित आहे. त्यात बेल्लारी येथून बेलेकेरी बंदरापर्यंत सुमारे ८ लाख टन लोहखनिजाच्या बेकायदेशी वाहतुकीचं प्रकरण समोर आलं होतं. हे लोहखनिज वनाधिकाऱ्यांनी जप्त केलं होतं. त्यानंतर हे लोहखनिज बेकायदेशीररीत्या उत्खनन करून बाहेर काढण्यात आले होते, अशी माहिती समोर आली.
त्यानंतर एका विशेष न्यायालयाने काँग्रेसचे आमदार आणि इतर काही जणांना या प्रकरणात दोषी ठरवून सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत जामीन दिला होता. दरम्यान, बेकायदेशीर खनिजाच्या निर्यातीमुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे ३८ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, असा दावा ईडीने केला आहे. आता या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध ईडीकडून घेतला जात आहे.