शौर्य पाटील आत्महत्याप्रकरणी न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी १२ मार्चला होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:39 IST2025-12-05T16:39:15+5:302025-12-05T16:39:41+5:30
शौर्य पाटील याने शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून छळ झाल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहीत आत्महत्या केली होती

शौर्य पाटील आत्महत्याप्रकरणी न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी १२ मार्चला होणार
सांगली : शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणात गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी न्यायालयानेदिल्लीपोलिसांना नोटीस बजावत प्रकरणाचा स्थिती अहवाल मागितला. पुढील सुनावणी १२ डिसेंबरला होणार असून, त्यावेळी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. शौर्यचे कुटुंबीय मूळचे खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील आहेत. त्यामुळे याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले होते.
शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या आत्महत्येची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. दिल्ली पोलिसांच्यावतीने वकील संजय लाउ यांनी सांगितले की, जर शौर्यचे पालक पोलिसांच्या तपासावर असमाधानी असतील तर ते प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यास तयार आहेत.
वाचा- शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद, शाळेवर कारवाईची खासदार विशाल पाटील यांची मागणी
प्रदीप पाटील यांच्यावतीने वकील प्रितीश सभरवाल यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यास चार तासांचा विलंब झाला आणि पोलिसांनी शौर्यच्या पालकांना या प्रकरणात शाळेचे नाव समाविष्ट करू नये, असे सांगितले होते. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
सुनावणीदरम्यान पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले की, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत. त्या फुटेजनुसार शाळेवर केलेल्या काही आरोपांची पुष्टी होत आहे. शौर्य पाटील याने शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून छळ झाल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहीत आत्महत्या केली होती. आरोप केलेल्या शिक्षकांवर तक्रार दाखल करण्यात आली असली तरी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेत शौर्य इयत्ता दहावीत शिकत होता. त्याने १८ नोव्हेंबरला राजेंद्रनगर येथील मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत आत्महत्या केली होती. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी निदर्शने केली होती. खानापूर तालुक्यातही आंदोलन करण्यात आले होते.