'मॅडम, ७० लाख आलेत...'; एका फोन कॉलने IRS अधिकाऱ्याचे बिंग फुटले; लाच प्रकरणात अटक, घरात सापडले घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:52 IST2026-01-01T14:45:52+5:302026-01-01T14:52:31+5:30
१३ कोटींची करचोरी दाबण्यासाठी दीड कोटींची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यारा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

'मॅडम, ७० लाख आलेत...'; एका फोन कॉलने IRS अधिकाऱ्याचे बिंग फुटले; लाच प्रकरणात अटक, घरात सापडले घबाड
Female IRS Officer Caught Taking Bribe: उत्तर प्रदेशातील झांसी येथे सेंट्रल जीएसटी विभागात लाचखोरीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. सीबीआयने एका हाय-प्रोफाइल कारवाईत २०१६ बॅचच्या आयआरएस अधिकारी आणि सीजीएसटीच्या डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारी यांच्यासह दोन अधीक्षकांना अटक केली आहे. तब्बल दीड कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ७० लाख रुपयांची लाच स्वीकारताना हे अधिकारी जाळ्यात अडकले.
प्रभा भंडारी या कारवाईच्या वेळी दिल्लीत होत्या, तर झांसीमध्ये त्यांचे दोन कनिष्ठ अधिकारी अनिल तिवारी आणि अजय कुमार शर्मा लाचेची रक्कम स्वीकारत होते. सीबीआयने या दोघांना ७० लाख रुपयांसह रंगेहाथ पकडले. त्यानंतर सीबीआयने अनिल तिवारी याला आपल्यासमोर प्रभा भंडारींना फोन करायला लावला. यावेळी अनिल तिवारी यांनी मॅडम, पार्टीकडून ७० लाख रुपये आले असं म्हटलं. त्यावर प्रभा भंडारी यांनी खूप छान, हे पैसे सोन्यात रूपांतरित करून मला आणून द्या असं म्हटलं. हा संवाद सीबीआयने रेकॉर्ड केला आणि हाच सर्वात मोठा पुरावा ठरला. या एका कॉलच्या आधारे दिल्लीतून प्रभा भंडारींना तातडीने अटक करण्यात आली.
१३ कोटींची करचोरी दाबण्यासाठी १.५ कोटींची डील
झांसी येथील जय दुर्गा हार्डवेअर या फर्मवर १९ डिसेंबर रोजी प्रभा भंडारी यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला होता. या फर्मवर सुमारे १३ कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप होता. ही कारवाई थांबवण्यासाठी दीड कोटी रुपयांची लाच मागण्यात आली होती. व्यावसायिक राजू मंगनानी आणि वकील नरेश कुमार गुप्ता यांच्या माध्यमातून हा व्यवहार ठरला होता.
छापेमारीत काय काय मिळाले?
सीबीआयने प्रभा भंडारी यांच्या दिल्ली, झांसी आणि ग्वाल्हेर येथील ठिकाणांवर छापे टाकले. या शोधमोहिमेत धक्कादायक मालमत्ता उघड झाली आहे. भंडारी यांच्याकडे सुमारे ९० लाख रुपये रोख, २१ किलो वजनाच्या चांदीच्या विटा,मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, दिल्लीत ६८ लाखांचा फ्लॅट आणि इतर गुंतवणुकीची कागदपत्रे असा एकूण १.६० कोटी रुपयांहून अधिक ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पाच जण अटकेत
या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांना गाझियाबाद आणि झांसी कोर्टात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर लखनऊ येथील विशेष सीबीआय कोर्टात नेण्यात आले आहे.