"शाळेत केस व्यवस्थित कापून येत जा’’, खडसावल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या संचालकांची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:38 IST2025-07-11T11:37:50+5:302025-07-11T11:38:12+5:30
Haryana Crime News: शाळेत येताना केस व्यवस्थित कापून येत जा असे सांगत खडसावल्याने संतापलेल्या दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या संचालकांची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील हिसार जिल्ह्यात घडली आहे.

"शाळेत केस व्यवस्थित कापून येत जा’’, खडसावल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या संचालकांची केली हत्या
शाळेत येताना केस कापून येत जा असे सांगत खडसावल्याने संतापलेल्या दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या संचालकांची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील हिसार जिल्ह्यात घडली आहे. येथील एका खाजगी शाळेमध्ये संचालक असलेल्या जगबीर सिंग पन्नू यांनी शाळेच्या आवारात शिस्तपालन करावे यासाठी सदर विद्यार्थ्यांना खडसावले होते. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी संधी साधून पन्नू यांच्यावर हल्ला केला. तसेच चाकूने वार करून त्यांची हत्या केली.
याबाबत समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही विद्यार्थी शाळेच्या इमारतीवरून पळताना दिसत आहेत. हांसी येथील पोलीस अधीक्षक अमित यशवर्धन यांनी सांगितले की, पुट्ठी गावातील रहिवासी असलेल्या पन्नू यांनी गंभीर जखमी अवस्थेत हिसार येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये आरोपी विद्यार्थी केस व्यवस्थित कापून शाळेत न आल्याने पन्नू हे त्यांच्यावर संतापले होते. त्यामुळे हे विद्यार्थी नाराज झाले होते. दोन्ही विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
संचालकांची हत्या करणारे विद्यार्थी हे अल्पवयीन आहेत का? असे विचारले असता पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विद्यार्थी अनुक्रमे अकरावी आणि बारावीमध्ये शिकणारे आहेत. हे विद्यार्थी बास गावातील रहिवासी आहेत. शाळेतील समुपदेशनादरम्यान, संचालक पन्नू यांनी विद्यार्थांना केस व्यवस्थित कापण्याचा आणि कपडे व्यवस्थित घालण्याचा सल्ला दिला होता. तसेच केवळ आरोपी विद्यार्थीच नाही तर इतर विद्यार्थयांनाही पन्नू यांनी खडसावले होते.
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी सध्या फरार आहेत. तसेच त्यांना पकडण्यासाठी सीसीटीव्हीमधील चित्रिकरणाची पडताळणी केली जात आहे. इतर विद्यार्थी आणि शिक्षकांकडेही या विद्यार्थ्यांबाबत चौकशी केली जात आहे. तसेच हे विद्यार्थी समाज माध्यमांवरील कुठल्या तरी टोळीपासून प्रभावित झालेले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.