मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 22:35 IST2025-11-28T22:34:18+5:302025-11-28T22:35:24+5:30
जायसवाल हे डॉ. मनमोहनसिंग यांच्या केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री आणि गृह राज्यमंत्रीही होते.

मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
उत्तर प्रदेशातील कानपूरचे माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जायसवाल यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज तब्येत खालावल्यामुळे त्यांना कानपूर येथील कार्डिओलॉजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जायसवाल हे डॉ. मनमोहनसिंग यांच्या केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री आणि गृह राज्यमंत्रीही होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार -
श्रीप्रकाश जायसवाल कानपूर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या. त्यांनी २००९ ते २०१४ दरम्यान केंद्रीय कोळसा मंत्री म्हणून, तर २००४ ते २००९ या काळात गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
शहर काँग्रेस कमिटीपासून सुरू झाला होता राजकीय प्रवास -
२५ सप्टेंबर १९४४ रोजी कानपूर येथे जन्मलेल्या जायसवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषवून केली. यानंतर ते १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग खासदार म्हणून निवडून आले.
जायसवाल यांची तब्येत आज सकाळी अधिकच बिघडली, यानंतर, त्यांना कार्डिओलॉजी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांच्या निधनाची पुष्टी केली. मृत्यूचे मुख्य कारण हृदयसंबंधी गुंतागुंत असल्याचे सांगण्यात आले.
प्रमुख नेत्यांकडून शोक व्यक्त
त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. जायसवाल यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी कानपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.