Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:38 IST2025-11-25T15:35:50+5:302025-11-25T15:38:48+5:30
Cancer Scare: भाजलेल्या चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाइन' नावाच्या विषारी केमिकलचा वापर केला जात असल्याचा दावा केला जात आहे.

Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
भाजलेल्या चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाइन' नावाच्या विषारी केमिकलचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला. याबाबत शिवसेना उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना पत्र लिहून यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, भाजलेल्या चण्यांना रंग देण्यासाठी वापरले जाणारे ऑरामाइन हे मूळात कापड्यासाठी वापरले जाणारे औद्योगिक केमिकल आहे. अन्नात याचा वापर करणे हे केवळ अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन नसून, लाखो भारतीयांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने ऑरामाइनला संभाव्य कर्करोगजन्य पदार्थ म्हणून घोषित केले. ऑरामाइनच्या सेवनामुळे यकृत, मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच, यामुळे मज्जासंस्था आणि इतर अवयवांनाही नुकसान होण्याची शक्यता आहे.
भारतात, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत अन्नात औद्योगिक रंगांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी आहे. परंतु, असे असूनही अनेक लोक बेकायदेशीरपणे ऑरामाइनचा वापर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी यांनी या धोक्यापासून लोकांना वाचवण्यासाठी देशव्यापी जनजागृती मोहीम राबवावी. तसेच या विषारी रंगाचा वापर त्वरित थांबवून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी केली आहे.