Breaks the record of 52 years of lok sabha voting in Gujarat; The sign of change? | गुजरातमध्ये 52 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडला; सत्ता परिवर्तनाचे संकेत?

गुजरातमध्ये 52 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडला; सत्ता परिवर्तनाचे संकेत?

अहमदाबाद : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच लोकसभा निवडणूक पाहणाऱ्या गुजरातमधील मतदारांनी मागील 52 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडला आहे. यावेळी लोकसभेला 64.11 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा वाढलेला टक्का विधानसभेचीच पुनरावृत्ती करणार की गुजरातच्या सुपुत्राच्या पारड्यात मत टाकली हे येत्या 23 मे रोजीच कळणार आहे. मात्र, या विक्रमामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात धडकी भरली आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 23 एप्रिलला झाले. या तीन टप्प्यांमध्ये 303 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी इतर राज्यांमध्ये 2014 सारखेच मतदान झाले असले तरीही गुजरात मात्र अपवाद ठरले आहे. गुजरातने गेल्या 52 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1967 मध्ये गुजरातमध्ये 63.77 टक्के मतदान झाले होते. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे हे मतदान 63.6 टक्के झाले होते. निवडणूक आयोगाने बुधवारी मतदानाची टक्केवारी जाहीर केली. 


या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला फायदा होणार याबाबतचे अंदाज आताच लावणे चुकीचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा कल पाहता या मतदानाचा फायदा काँग्रेसलाच अधिक होण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. गेल्या निवडणुकीला सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. हा आकडा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक 75.21 टक्के मतदान वलसाडमध्ये झाले आहे. तर सौराष्ट्र आणि अमरेलीमध्ये कमी म्हणजेच 55.75 टक्के मतदान झाले आहे. हा परिसर पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांमधील असंतोषामुळे धगधगत आहे. 


आदिवासी भागात तुफानी मतदान
आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. बारदोलीमध्ये 73.57 टक्के, यानंतर छोटा नागपूर 73.44 आणि भरुचमध्ये 73.21 टक्के मतदान झाले. वलसाडसह हा भाग आदिवासी बहुल आहे. 
एका वृत्तपत्राशी बोलताना राजकीय विश्लेषक हेमंत कुमार शाह यांनी सांगितले की, मतदानाचा वाढलेला टक्का हा भाजपाच्या पारड्यात पडला असे म्हणता येणार नाही. मात्र, जर हे मतदान शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढले असेल तर त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. आदिवासी भागात झालेले मतदान हे बदलाचे संकेत देते. मात्र, आताच अंदाज लावणे कठीण जाईल. 

काँग्रेसला 8 ते 10 जागा?
तर पॉलिटीकल सायन्सचे निवृत्त प्राध्यापक दिनेश शुक्ला यांनी सांगितले की, आदिवासी, दलित आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदाता आहे. यामुळे टक्केवारीवरून असे दिसतेय की भाजपाला सर्वच्या सर्व जागा मिळणार नाहीत. 2014 च्या तुलनेत मतदानाचा पॅटर्न बदलला आहे. काँग्रेसला गुजरातमध्ये 8 ते 10 जागा मिळतील. 

Web Title: Breaks the record of 52 years of lok sabha voting in Gujarat; The sign of change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.