BJP will benefit greatly from udayanraje bhosle - Chief Minister | उदयनराजेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल - मुख्यमंत्री
उदयनराजेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल - मुख्यमंत्री

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा, जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले उपस्थित होते. 

उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महारांचे वंशज उदयनराजे भोसले यांचे भाजपात प्रवेश केल्यामुळे स्वागत केले. ते म्हणाले, "महाराजांच्या प्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल. पक्षाची ताकद वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला महाराजांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी काल रात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता नव्याने निवडणूक लढून रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील आणि पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेत जातील. पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत सोबतच होईल."

तसेच, उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे तोंडभरून कौतुक केले. देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविले. नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या विचारांशी सहमत असल्यामुळे भाजपा प्रवेश केला आहे. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. निस्वार्थ भावेनेतून लोकांच्या हितासाठी भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांनी काल रात्री मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे भोसले यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते. 

याचबरोबर, लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्यात यावी, तसेच लोकसभेला दगाफटका झाल्यास राज्यसभेचे सदस्यत्व मिळावे, या दोन अटी उदयनराजे भोसले यांनी भाजपा श्रेष्ठींपुढे ठेवल्या होत्या, त्या मान्य झाल्याने उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली होती. 

दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. साता-यात उदयनराजेप्रेमींनी घेतलेल्या मेळाव्यात राजेंनी भाजपामध्ये जावे, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. उदयनराजेंनी मात्र भाजपा प्रवेशाबाबत कोणतेच जाहीर वक्तव्य केले नव्हते. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साता-यात येऊन उदयनराजेंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. 


Web Title: BJP will benefit greatly from udayanraje bhosle - Chief Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.