अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 08:36 IST2025-11-20T08:35:04+5:302025-11-20T08:36:55+5:30
जवळपास ५० मिनिटे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीतील तक्रारीचा पाढा शिंदे यांनी शाहांसमोर वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने राग भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता.

अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
नवी दिल्ली - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे वगळता शिंदेसेनेच्या एकाही मंत्र्यांनी हजेरी लावली नाही. या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. जवळपास ५० मिनिटे या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत शिंदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची तक्रार केली.
एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील राजकारणावरून शाहांकडे तक्रार केली. विशेषत: सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात शिंदेसेनेच्या अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम रवींद्र चव्हाण यांच्याकडून केले जात आहे. आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपात प्रवेश दिला जात आहे. हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकते. त्यातून वातावरण दूषित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे असं त्यांनी शाहांना सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. परंतु काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे विरोधकांना त्याचा अनावश्यक फायदा मिळत आहे. माध्यमांमधून महायुतीबाबत चुकीचे चित्र समोर येत आहे. ज्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण होत आहे. काही नेते वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत आहेत, ही वागणूक रोखण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. युतीतील नेत्यांनी एकमेकांवरील टीका टाळायला हवी. सार्वजनिक विधाने करताना संयम बाळगणे, सुसंवाद ठेवणे ही अपेक्षा आहे. भाजपाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांना हे कळवलं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांना म्हटलं.
Delhi: Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde met Union Home Minister Amit Shah pic.twitter.com/yxVyNoIADQ
— IANS (@ians_india) November 19, 2025
दरम्यान, जवळपास ५० मिनिटे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुतीतील तक्रारीचा पाढा शिंदे यांनी शाहांसमोर वाचून दाखवला. त्यात प्रामुख्याने राग भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात मी रडणारा नाही लढणारा आहे. मी स्थानिक मुद्दे राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. बिहार निवडणुकीत एनडीएचे ५ घटक एकत्र आले तेव्हा निकाल चांगले लागले, महाराष्ट्रातही हे आपण पाहिले आहे असं शिंदे यांनी सांगितले.