"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 20:45 IST2025-12-26T20:44:05+5:302025-12-26T20:45:16+5:30
Kumar Vishwas on Dhurandar and BJP: "धुरंधर पाकिस्तानविरोधी प्रपोगंडा चित्रपट असेल तर टाळ्या वाजवा ना..."

"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
Kumar Vishwas on Dhurandar and BJP: भारतात सध्या राजकारण आणि धुरंधर अशा दोन गोष्टी गाजतायत. या दोन्ही गोष्टींची सांगड घालून प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी मजेशीर विधान करत विरोधकांना कोपरखळी मारली. उत्तर प्रदेश सरकारच्या एका कार्यक्रमानिमित्त कुमार विश्वास मंचावर उपस्थित होते. तेव्हा त्यांनी अतिशय मजेशीर पद्धतीने विरोधकांवर टीका केली.
कुमार विश्वास काय म्हणाले?
"धुरंधर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरताना दिसतोय. काही जण त्यावर टीका करत आहेत. धुरंधर हा साडेतीन तासांचा चित्रपट आहे. एकदा चित्रपट बनला की तो पाहायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. ज्यांना पाहायचा होता, त्यांनी पाहिला आणि कौतुक केला. पण ज्यांना विरोध करायचा होता, त्यांनी हा चित्रपट प्रपोगंडा मुव्ही असल्याचे म्हटले. हा प्रचार कुणाविरुद्ध आहे? असे विचारल्यावर ते लोक उत्तर देतात की हे पाकिस्तानविरुद्ध आहे. तसं असेल तर आपण सर्वांनीच टाळ्या वाजवायला हव्या. मला असं वाटतं की भाजपचे लोक खूप हुशार आहेत. ते दर पाच दिवसांनी विरोधी पक्षांना होमवर्क देतात. पण आश्चर्य म्हणजे विरोधकही तो होमवर्क घेऊन जातात. अरे, ते तुम्हाला होमवर्क देत असतील तर तुम्ही घेऊ नका ना... दरवेळी असाच विरोधी पक्ष फसतो आणि गोंधळून जातो," असे कुमार विश्वास म्हणाले.
टीका करणाऱ्यांवर टीकास्त्र
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही अशा लोकांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, "जेव्हा जेव्हा धुरंधरसारखा चित्रपट येतो, तेव्हा इंडस्ट्रीतील लोक अशा चित्रपटांना स्वतःसाठी धोका समजू लागतात. इतकेच नाही तर असे लोक चित्रपटाकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले होते की, जेव्हा जेव्हा धुरंधरसारखा क्रांतिकारी चित्रपट येतो तेव्हा इंडस्ट्रीतील लोक अशा चित्रपटांना नावं ठेवतात आणि स्वतःला दूर ठेवायचा प्रयत्न करतात. काही कथानके सर्वांना आकर्षिक करायचा प्रयत्न करतात. पण अशा चित्रपटांमधील कथा सर्व श्रेणीतील प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात बोथट होतात."