आठवलेंच्या मंत्रिपदाबाबत भाजपाचे हात वर

By Admin | Updated: May 24, 2014 04:14 IST2014-05-24T04:14:57+5:302014-05-24T04:14:57+5:30

रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य रामदास आठवले गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकून असून मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत;

BJP hands over Ashwale's ministry | आठवलेंच्या मंत्रिपदाबाबत भाजपाचे हात वर

आठवलेंच्या मंत्रिपदाबाबत भाजपाचे हात वर

यदु जोशी, नवी दिल्ली - रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य रामदास आठवले गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकून असून मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत; पण त्यांना अद्याप कुठूनही शब्द मिळालेला नाही. भाजपाने त्यांच्याबाबत हात वर केल्याचे चित्र असल्याने आठवलेंची चिंता आणखीच वाढली आहे. महाराष्ट्रातील महायुतीमध्ये गेल्यापासून आठवलेंना राज्यसभेच्या खासदारकीची शिवसेनेकडून जास्त अपेक्षा होती. कारण, शिवसेनेच्या मध्यस्थीमुळेच ते महायुतीमध्ये सहभागी झाले. मात्र, शिवसेनेने शेवटपर्यंत त्यांना खासदारकी दिली नाही. शेवटी भाजपाने प्रकाश जावडेकर यांचा बळी घेत आठवले यांना राज्यसभेवर पाठविले. आठवले हे चार दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. आज ते ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भेटले. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचीही त्यांनी भेट घेतली. ज्येष्ठ नेते खा. गोपीनाथ मुंडे यांना ते आधीच भेटले आहेत. असे असले तरी त्यांना कोणीही शब्द दिलेला नाही. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आज ‘लोकमत’शी बोलताना आठवलेंबाबतची असमर्थता व्यक्त केली. सूत्रांनी सांगितले की, ‘आम्ही तुम्हाला खासदारकी दिली आता तुम्ही शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रीपद मिळवा,’ असे भाजपाच्या नेत्यांनी आठवले यांना सांगितले आहे. शिवसेनेचे महाराष्ट्रातून १८ खासदार निवडून आले असून, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद आणि फारतर दोन राज्यमंत्रिपदे मिळतील, असे म्हटले जाते. दोन राज्यमंत्रिपदांपैकी एक आठवलेंना देण्याच्या मन:स्थितीत शिवसेना नाही. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष म्हणून आठवले यांच्या नावाचा विचार स्वतंत्रपणे करावा, त्यांना कोणाच्या आणि निदान आमच्या कोट्यात तरी टाकू नये, अशी भूमिका शिवसेना घेणार हे जवळपास स्पष्ट आहे. आठवले यांनी मात्र दलित नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी आडवाणी यांच्याशी चर्चेत केली. राज्यसभेत काँग्रेस आणि मित्रपक्षांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृहात निर्णय घेताना मोदी सरकारची अडचण होणार आहे. म्हणून काही अपक्ष खासदारांना भाजपाच्या पाठीशी उभे करण्याची खटपट महाराष्ट्रातील अपक्ष खासदार संजय काकडे करीत आहेत.

Web Title: BJP hands over Ashwale's ministry