नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवलं अन् गाणं गुणगुणत शहीद झाले सब इन्स्पेक्टर, चित्तथरारक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:44 PM2021-04-05T15:44:53+5:302021-04-05T15:46:02+5:30

chhattisgarh naxalite attack: छत्तीसगढच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २२ जवानांमध्ये समावेश असलेल्या सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज यांचं २०१९ साली लग्न झालं होतं.

Bijapur Naxali attack sub Inspector deepak bhardwaj Saved 4 to 5 Jawans Before Succumbing To Ied Blast | नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवलं अन् गाणं गुणगुणत शहीद झाले सब इन्स्पेक्टर, चित्तथरारक कहाणी

नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवलं अन् गाणं गुणगुणत शहीद झाले सब इन्स्पेक्टर, चित्तथरारक कहाणी

Next

छत्तीसगढच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २२ जवानांमध्ये समावेश असलेल्या सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज यांचं २०१९ साली लग्न झालं होतं. बास्केटबॉल आणि गाण्याचा छंद असलेले दीपक भारद्वाज यांनी याआधी देखील अनेकदा नक्षलवाद्यांचा बिमोड केला आहे. शनिवारी देखील अशाच एका ऑपरेशनवर निघालेल्या दीपक भारद्वाज यांच्या पथकाला नक्षलवाद्यांनी घेरलं आणि जोरदार गोळीबार सुरू केला. यात अनेक जवान जखमी झाले. दीपक भारद्वाज यांनी प्रसंगावधान बाळगून आपल्या अनुभवाचा वापर करत साथीदार जवानांचा घेरा करुन नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान झालेल्या आयईडी बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यांना प्राण गमावावे लागले. 

"में वापस आऊंगा...", आई-बाबांना वचन देऊन होळीच्याआधी सोडलं होतं घर; शहीद वीराची मन सुन्न करणारी कहाणी

६ सप्टेंबर १९९० मध्ये जन्म झालेल्या दीपक भारद्वाज २०१३ साली छत्तीसगडमध्ये पोलीस दलात भरती झाले होते. बिजापूर येथे त्यांची ड्युटी होती. त्यांच्या सहकारी जवानांनी दिलेल्या माहितीनुसार दबावाच्या क्षणी गाणं गुणगुणण्याची दीपक भारद्वाज यांची सवय होती. शनिवारी देखील जेव्हा ते नक्षलवाद्यांना तोंड देत होते. तेव्हाही आपल्या सहकारी जवानांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ते देशभक्तीपर गाणं गुणगुणत होते. पण नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटामुळं त्यांचा मृत्यू झाला. 

जांजगीर जिल्ह्याच्या पिहरीद येथील ते रहिवासी होते. दीपक यांच्याशी होळीपूर्वी शेवटचं बोलणं झालं होतं, अशी माहिती त्यांचे वडील राधेलाल भारद्वाज यांनी दिली. शनिवारी जेव्हा नक्षलवाद्यांचा हल्ला झाल्याचं समजलं तेव्हा ते देखील बिजापूर येथे रवाना झाले. त्यांनी हल्ल्यानंतर आपल्या मुलाचा शोध घेतला. बराच शोध घेतल्यानंतर बिजापूरच्या जीवनागुडा परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. 

दीपक भारद्वाज यांनी इयत्ता सहावी ते १२ पर्यंतचं शिक्षण नवोदय विद्यालय मल्हार येथून पूर्ण केलं होतं. ते एक चांगले बास्केटबॉल खेळाडू होते आणि शालेय पातळीवर राष्ट्रीय बॉस्केटबॉल स्पर्धा देखील खेळले होते. 
 

Web Title: Bijapur Naxali attack sub Inspector deepak bhardwaj Saved 4 to 5 Jawans Before Succumbing To Ied Blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.