Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:59 IST2025-11-17T13:57:05+5:302025-11-17T13:59:01+5:30
Bihar Next Chief Minister: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर आपला माणूस बसवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Nitish Kumar Bihar Chief Minister News: बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोणाचा असणार, याबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच एनडीएचे सरकार काम करणार आहे. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता राहिली आहे, असे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
पाटणामध्ये माध्यमांशी बोलताना दिलीप जैस्वाल म्हणाले, "उद्या (१८ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता भाजपच्या कार्यालयातील अटल सभागृहात भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यसभा, लोकसभेतील सर्व खासदार, सर्व आमदार आणि विधान परिषदेचे आमदारही उपस्थित असणार आहे. सर्वांच्या संमतीने सभागृह नेत्याची निवड केली जाणार आहे", अशी माहिती बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी दिली.
"नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे"
"आज सायंकाळपर्यंत निरीक्षकांची नियुक्ती केली जाईल. भाजपच्या बैठकीनंतर एनडीएच्या आमदारांची बैठक होईल. मग त्या बैठकीमध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसार सभागृह नेत्याची निवड करणार आहोत", दिलीप जैस्वाल यांनी सांगितले.
यावर जैस्वाल यांना प्रश्न विचारण्यात आला की, नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार, यात कोणतीही शंका नाहीये ना? त्यावर जैस्वाल म्हणाले की, त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे, फक्त कायदेशीर प्रक्रियेनुसार करायचे आहे. त्यांचीच निवड केली जाणार आहे फक्त औपचारिकता राहिली आहे", असे उत्तर जैस्वाल यांनी दिले.
भाजपला प्रतिक्षा करावी लागणार
बिहारमध्ये भाजपला अजूनही आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही. यावेळी भाजपने ८९ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. पण, भाजपने जेडीयूसोबतची मैत्री कायम ठेवत पुन्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच राज्य चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयूने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट जागा जिंकल्या आहेत. पण, भाजपपेक्षा जेडीयूला कमीच जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळीही भाजपने एनडीएमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, निवडणुकीआधीच नितीश कुमार मुख्यमंत्री होणार हे जाहीर केले होते. यावेळी एनडीएने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलेला नव्हता. त्यामुळेच भाजप वेगळा निर्णय घेऊ शकतो अशी चर्चा सुरू होती.