बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 22:51 IST2025-10-19T22:51:19+5:302025-10-19T22:51:58+5:30
बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतरही अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही.

बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
पटना - विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीत फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्या बिहारमधून इंडिया आघाडीची सुरुवात झाली तिथेच ही आघाडी विखुरताना दिसत आहे. बिहारच्या पटना येथे २३ जून २०२३ साली नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची पहिली बैठक झाली होती. मात्र आज २ वर्षांच्या कमी काळातच नितीश कुमार एनडीएत परतले आणि बिहारमध्ये भाजपाविरोधात जी एकजूट तयार करण्यात आली होती. ती इंडिया आघाडीही तुटण्याच्या मार्गावर आहे.
इंडिया आघाडीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २३४ जागांवर विजय मिळवत त्यांची ताकद दाखवून दिली. परंतु त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीसारख्या निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीला शह मिळाला. तृणमूलसोबत आघाडीचे नेतृत्व कोण करणार यावरून झालेला संघर्ष असेल किंवा दिल्ली निवडणुकीत आपसोबत फिस्कटलेली चर्चा असेल, आता काँग्रेस आरजेडीसोबत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वादात सापडली आहे. बिहारमध्ये अनिश्चितता असताना शेजारील झारखंड राज्यातही झटका लागला आहे. याठिकाणी जेएमएमसोबत आघाडीवर पुन्हा विचार सुरू आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा प्रवास इथेच संपणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जागावाटपावरून रस्सीखेंच
बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतरही अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. त्यामुळे महाआघाडीत अनेक जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार उतरवण्यात आले आहेत. वैशाली, लालगंज, कहलगाव, बिहारशरीफसारख्या ठिकाणी आरजेडी आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना आहे तर बछवाडा, रोसरा येथे सीपीआयची काँग्रेससोबत लढत आहे. दुसरीकडे आरजेडी नेते मृत्यूंजय तिवारी यांना अजूनही महाआघाडीतील मतभेद संपुष्टात येण्याचा विश्वास आहे. आरजेडी केवळ बिहार, झारखंडमध्ये निवडणूक लढते. आम्ही काँग्रेसकडून कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशातील जागांची मागणी केली नाही. त्यामुळे काँग्रेसने राज्यातील परिस्थिती समजून घ्यावी असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, तेजस्वी यादव यांना महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी आरजेडी नेते करत आहेत. काँग्रेसने अद्याप हा प्रस्ताव मान्य केला नाही. बिहारमध्ये काँग्रेसचे काही नेते खासगीरित्या यादव यांना पसंत करतात परंतु पक्षाचे केंद्रीय नेतृत्व यावर काहीही बोलण्यास तयार नाही. जर आरजेडीचा प्रस्ताव मान्य केला तर अशा मतदारांवर प्रभाव पडेल जे अद्यापही लालूप्रसाद यादव यांच्या जंगल राजला घाबरतात. मात्र महाआघाडीत सर्व काही ठीक असून केवळ घोषणा बाकी आहे जी योग्य वेळी केली जाईल असं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं.