बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 06:33 IST2025-10-19T06:33:20+5:302025-10-19T06:33:35+5:30
पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही.

बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर यादरम्यान १२ मोठ्या सभा घेणार आहेत. गरज भासल्यास दुसऱ्या टप्प्यात ते आणखी काही सभा घेण्याची शक्यता आहे. भाजपने एनडीएच्या प्रचार मोहिमेचा सविस्तर आराखडा आणि स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. सर्व २४३ जागांसाठी उमेदवारी वाटपही शांततेत पूर्ण झाले आहे.
याउलट, महाआघाडीतील काँग्रेस, राजद आणि इतर पक्षांमध्ये काही जागांवर अजूनही मतभेद कायम आहेत. एकत्र प्रचार, संयुक्त जाहीरनामा किंवा कार्यक्रमाचे नियोजन याबाबतही त्यांचा ठोस निर्णय झालेला नाही.
पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. बिहारमधील त्यांचा यापूर्वीचा अखेरचा कार्यक्रम २४ ऑगस्टला पाटणा येथे झाला होता. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही.
राहुल गांधींचा भेटीस नकार
लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव दिल्लीला आले तेव्हा राहुल गांधींनी त्यांची भेट घेतली नाही. त्यांना के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या निवडणुकीत राज्यात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना असला तरी प्रत्यक्ष लढत मोदी विरुद्ध राहुल अशीच दिसून येत आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने या संघर्षात रोचक रंग भरला आहे.
पंतप्रधान मोदी हे २३ ऑक्टोबरला सासाराम, गया आणि भागलपूर येथे सभा घेतील. त्यानंतर २८ ऑक्टोबरला दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटणा येथे त्यांच्या सभा होतील. त्यांच्या तिसऱ्या टप्प्यात १ नोव्हेंबरला छपरा, पूर्व चंपारण आणि समस्तीपूर या ठिकाणांचा समावेश असेल. शेवटी, ३ नोव्हेंबरला पश्चिम चंपारण, सहर्सा व अररिया जिल्ह्यातील फोर्ब्सगंज येथे सभा होणार आहेत.