उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 06:03 IST2025-10-22T06:02:04+5:302025-10-22T06:03:14+5:30
महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. रिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत.

उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: भाजपप्रणीत एनडीएला बिहार विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा दावा करणाऱ्या महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. प्रारंभी महाआघाडीत सारे काही सुरळीत असल्याचे दिसत होते; परंतु उमेदवारांची यादी जाहीर होताच आघाडीतील दरी स्पष्ट झाली.
परिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी अनेक जागांसाठी दुहेरी अर्ज दाखल केले आहेत. १३ जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. अनेक जागांवर, महाआघाडीचे उमेदवार आमने-सामने आहेत. सुलतानगंज, कहलगावसारख्या जागांचा यात समावेश आहे.
राज्यातील २४३ विधानसभा जागांसाठी महाआघाडीचे एकूण २५६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राजदने १४३ जागांवर उमेदवार उभे केले असून मित्रपक्षांसाठी १०० जागा सोडल्या आहेत. काँग्रेसनेही त्यांच्या पसंतीनुसार ६१ जागा निवडल्या. भाकप आणि माकपव्यतिरिक्त व्हीआयपी पक्षाने १५ उमेदवार उभे केले आहेत; परंतु अनेक मतदारसंघांत हे पक्ष आमने-सामने आहेत.
मतदारसंघातील अशी आहे स्थिती...
सिकंदरा, कहलगाव, सुलतानगंज आणि नरकटियागंज या पाच जागांवर राजद आणि काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा. चैनपूर आणि बाबूबाढी या जागांवर व्हीआयपी आणि राजदमध्ये मतभेद आहेत. बछवारा, कारगहर, बिहार शरीफ आणि राजापाकर या चार जागांवर काँग्रेस आणि भाकपमध्ये तीव्र स्पर्धा आहे.
‘ज्यांचा पक्ष भक्कम त्यांनाच पाठिंबा देणार’
जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजप्रताप यादव यांनी निवडणुकीनंतर आपल्या पक्षाच्या संभाव्य पाठिंब्याबद्दल बोलताना जो पक्ष निवडणुकीनंतर भक्कम ठरेल, त्याच पक्षाला पाठिंबा असेल, असे जाहीर केले. महुआ मतदारसंघातून ते लढत असून, पाटण्यात त्यांनी सांगितले की, केवळ निवडणूक आहे म्हणून मी महुआला जात आहे, असे नाही. तेथील लोकांशी माझा सतत संपर्क आहे.
रोकड, दारू, लाच असा ७१ कोटींचा मुद्देमाल जप्त
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातल्या तपास यंत्रणांनी सुमारे ७१ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात रोख रक्कम, अमली पदार्थ, दारू, मौल्यवान वस्तू यांचा समावेश असल्याची माहिती बुधवारी निवडणूक आयोगाने दिली. राज्यात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी ८२४ फ्लाइंग स्कॉड तैनात केले असून, १०० मिनिटांच्या आत नोंद झालेल्या तक्रारीवर कारवाई केली जाणार आहे. आजपर्यंत ६५० आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी नोंद झाल्या होत्या. यापैकी ६१२ तक्रारी सोडवल्या असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.