Bengal man wants gold loan against cows after Dilip Ghosh's 'gold in milk' theory | गायी घ्या, गोल्ड लोन द्या; भाजपा नेत्याच्या 'त्या' विधानानंतर तरुणाची मागणी
गायी घ्या, गोल्ड लोन द्या; भाजपा नेत्याच्या 'त्या' विधानानंतर तरुणाची मागणी

ठळक मुद्देभाजपा नेत्याच्या दाव्यानंतर आता गायी घ्या आणि गोल्ड लोन द्या अशी मागणी एका तरुणाने केली आहे.  भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दोन दिवसांपूर्वी एक अजब विधान केलं होतं. सोन्याचा अंश असल्यानेच गायीच्या दुधाचा रंग पिवळसर असतो असं तर्कट केलं होतं.

कोलकाता - भाजपाचे नेतेमंडळी सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दोन दिवसांपूर्वी एक अजब विधान केलं होतं. सोन्याचा अंश असल्यानेच गायीच्या दुधाचा रंग पिवळसर असतो असं तर्कट केलं होतं. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा केल्यानंतर आता दुधामध्ये सोनं असल्याने गायी घ्या आणि गोल्ड लोन द्या अशी मागणी एका तरुणाने केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, घोष यांच्या विधानानंतर मणप्पूरम फायनान्स लिमिटेडच्या एका ब्रांचमध्ये एक तरुण आपल्या दोन गायींना घेऊन आला होता. तसेच गायींच्या बदल्यात त्याला गोल्ड लोन हवे आहे. 'मला गोल्ड लोन हवे आहे म्हणूनच मी माझ्या दोन गायींना घेऊन येथे आलो आहे. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं असं मी ऐकलं आहे. गायींवरच आमचं घर चालतं. माझ्याकडे 20 गायी आहेत. मला कर्ज मिळालं तर मी माझ्या व्यवसायाचा विस्तार करू शकतो' असं या गोल्ड लोन मागणाऱ्या तरुणाने म्हटलं आहे. 

दिलीप घोष यांनी 'देशी गायींच्या पाठीवर वाशिंड असते. विदेशी गायींची पाठ वाशिंडाविना व सपाट असते. वाशिंडामध्ये ‘स्वर्णनारी’ असते. जेव्हा त्यावर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्यातून सोने निर्माण होते. त्यामुळेच देशी गायीचे दूध पिवळसर किंवा साधारण सोन्याच्या रंगाचे असते. एखादा केवळ देशी गायीचे दूध पिऊनही नीट जगू शकतो. असे अनेक साधुसंत आहेत की जे केवळ गायीच्या दुधावर जगतात' असं म्हटलं होतं. त्यांच्या या अजब दाव्यानंतर आता तरुणाने गोल्ड लोनची मागणी केली आहे. 

'सुशिक्षित असलेले जे लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी श्वानाचे मांस खावे. ते आरोग्यासाठी चांगलं असतं' असंही दिलीप घोष यांनी म्हटलं होतं. बर्दवानमध्ये गोप अष्टमीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात घोष यांनी हे अजब विधान केलं. घोष यांनी फक्त श्वानच नाही तर आणखी प्राणी आहेत त्यांचं देखील मांस खा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? मात्र तुम्ही घरी भोजन करा असं म्हटलं आहे. तसेच 'गाय आपली माता आहे आणि गायीला मारणं असामाजिक आहे. समाजात असे अनेक लोक आहेत जे घरामध्ये विदेशी श्वान पाळतात. तसेच त्यांचे मलमूत्र देखील साफ करतात. मात्र हा मोठा अपराध आहे' असं घोष यांनी म्हटलं  होतं. 

'भारत हे भगवान कृष्णाचे स्थान आहे आणि येथे गायींप्रति नेहमीच सन्मान आणि आदर असतो. गायीच्या दूध पिऊन मुलं जगतात. गाय आपली आई आहे. त्यामुळे हिला कोणी मारलं तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही' असं देखील बर्दवानमधील कार्यक्रमात घोष यांनी म्हटलं आहे. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली आहे. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं. 

 

Web Title: Bengal man wants gold loan against cows after Dilip Ghosh's 'gold in milk' theory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.