अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:22 IST2026-01-12T18:21:58+5:302026-01-12T18:22:26+5:30
एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा ११ वर्षांच्या मोठ्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.

अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. कोतवाली सदर परिसरातील शाहबाजपूर मोहल्ल्यात गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे गुदमरून एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा ११ वर्षांच्या मोठ्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सलीम यांचा बरेली रोडवरील राय साहेब यांच्या धर्मशाळेजवळ कारखाना आहे आणि ते आपल्या कुटुंबासह कारखान्याच्या वरच्या मजल्यावर राहतात. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा अयान (११) आणि रयान (४) आंघोळीसाठी गेले होते. बाथरूममध्ये गॅस गिझर बसवलेला होता.
दोघांनी आतून दरवाजा बंद करून घेतला होता. बराच वेळ झाला तरी मुलं बाहेर न आल्याने सलीम यांची पत्नी रुखसार यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रुखसार यांचा आरडाओरडा ऐकून सलीम आणि इतर लोकांनी धाव घेतली आणि बाथरूमचा दरवाजा तोडला. आत दोन्ही मुलं बेशुद्धावस्थेत आढळली.
उपचासासाठी दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान रयानचा मृत्यू झाला. अयानची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बरेली येथे हलवण्यात आलं आहे. कोतवाली सदरचे प्रभारी निरीक्षक संजय सिंह यांनी सांगितलं की, ही दुर्घटना गॅस गिझरमुळे श्वास गुदमरल्याने झाली आहे.