आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:13 IST2025-07-01T15:40:57+5:302025-07-01T16:13:13+5:30
Himanta Biswa Sarma News: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे आज गोलाघाटच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताफ्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे आज गोलाघाटच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताफ्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना राजीव भवनजवळ ३० जून रोजी घडली. गोमुखी डेअर प्रकल्पामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात येथे काँग्रेसचे काही कार्यकर्ते सरमा यांच्याविरोधात आंदोलन करत होते. तेव्हा ही घटना घडली.
दरम्यान, हिमंत बिस्वा सरमा यांच्या ताफ्यावर जी बाटली फेकण्यात आली ती बाटली स्प्राईट या शितपेयाची होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. तसेच कुठल्याही वाहनाचंही नुकसान झालेलं नाही. मात्र घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन पोलिसांनी काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामधील एकजण काँग्रेसच्या माजी ब्लॅक अध्यक्षाचा मुलगा असल्याचेही सांगण्यात येत आहे. या सर्वांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आणि कर्तव्यामध्ये अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना हिमंता बिस्वा सरमा यांनी हे कृत्य म्हणजे काँग्रेसचा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. जर ही बाटली मला लागली असती तर बरं झालं असतं. काँग्रेसकडे आता करण्यासारखं राहिलेलं नाही. त्यामुळे ते अशा कृती करत आहेत, असा टोला सरमा यांनी लगावला आहे. तर भाजपाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेश केला आहे. आता या घटनेवर काँग्रेसचीही प्रतिक्रिया समोर आली असून, मुख्यमंत्र्यांवर बाटली फेकण्याचा आमचा हेतू नव्हता. काही व्यक्तींनी वैयक्तिकरीत्या हे कृत्य केलं, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.