मणिपूरमध्ये शांततेसाठी 3 कलमी योजना तयार, गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 09:07 PM2023-05-31T21:07:14+5:302023-05-31T21:07:52+5:30

मणिपूर दौऱ्यात अमित शाह हे मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये निर्माण झालेला वाद सोडवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

amit shah manipur visit home minister trying to bring three step solution to stop violence in the state | मणिपूरमध्ये शांततेसाठी 3 कलमी योजना तयार, गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये

मणिपूरमध्ये शांततेसाठी 3 कलमी योजना तयार, गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये

googlenewsNext

मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मणिपूर दौऱ्यात अमित शाह हे मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये निर्माण झालेला वाद सोडवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह हे तीन-स्तरीय दृष्टिकोनातून या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, संतप्त आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोन अनेक ठिकाणी रोखून धरले आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये खाण्यापिण्याचे संकटही निर्माण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्येकडील राज्यातील हिंसाचार त्वरित थांबवा आणि लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी तीन स्तरावर काम सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पहिले म्हणजे हिंसाचारात प्रभावित लोकांशी संवाद साधणे. दुसरे म्हणजे विस्थापितांचे सुरक्षेसह पुनर्वसन करणे आणि तिसरे म्हणजे बंडखोरांवर नियंत्रण ठेवणे. 

मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये विश्वास निर्माण करणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकार मणिपूरमधील समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यामध्ये शांततेसाठी किमान एकमत निर्माण करण्यासाठी काम करत आहे. याचबरोबर, सुरक्षा दल सर्व समुदायातील सदस्यांना त्यांच्याकडे शस्त्रे असल्यास त्यांना सुपूर्द करण्यास सांगत आहेत. मैतई आणि कुकी या दोन्ही समुदायातील प्रभावित लोकांमधील काही, ज्यांना सुरक्षित भागात नेण्यात आले होते, त्यांना त्यांच्या घरी परतायचे आहे. तसेच, प्रशासनाला त्यांना सुरक्षित वातावरण देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, जेणेकरून ते त्यांचे सामान्य जीवन पुन्हा सुरू करू शकतील, असे सुत्रांनी सांगितले. 

मणिपूरमधील 'आदिवासी एकता मार्च'नंतर पहाडी जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच जातीय हिंसाचार उसळला. 3 मे रोजी अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीसाठी मैतेई समाजाने आंदोलन केले, त्यानंतर 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला. यानंतर गेल्या रविवारच्या हिंसाचारासह इतर हिंसक घटना घडल्या. रविवारी झालेल्या हिंसाचारात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कुकी ग्रामस्थांना राखीव वनजमिनीतून बेदखल करण्यावरून तणावामुळे आधीही हिंसाचार झाला होता, ज्यामुळे अनेक लहान-लहान आंदोलने झाली होती. मैतेई समुदाय मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के आहे आणि बहुतेक समुदाय इंफाळ खोऱ्यात राहतात. नागा आणि कुकी समुदाय हे एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

10 लाख रुपये, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी...
केंद्र आणि मणिपूर सरकारने राज्यातील जातीय दंगलीदरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी गेल्या मंगळवारी ही माहिती दिली. दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही दिली जाणार आहे. दरम्यान, नुकसान भरपाईची रक्कम केंद्र आणि राज्य सरकार समान पद्धतीने उचलेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 
 

Web Title: amit shah manipur visit home minister trying to bring three step solution to stop violence in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.