Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:36 IST2025-06-20T15:35:49+5:302025-06-20T15:36:22+5:30

एका प्राथमिक शाळेच्या व्हिडिओमुळे तृणमूल सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे. व्हिडिओमध्ये ६८ मुलं छत्री घेऊन अभ्यास करत आहेत

amit malviya slams mamata banerjees over students holding umbrellas due to rainwater leaks in hooghly school watch video | Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेच्या व्हिडिओमुळे तृणमूल सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे. व्हिडिओमध्ये ६८ मुलं छत्री घेऊन अभ्यास करत आहेत, कारण वर्गाच्या छतावरून पाणी टपकत आहे. शाळेचे मुख्याध्यापक जयंत गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसारस शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शाळेची स्थिती पाहून भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

हुगळी जिल्ह्यातील पंडुआ ब्लॉकमधील प्राथमिक शाळेत मुलांना छत्री घेऊन अभ्यास करावा लागत आहे. शाळेच्या छतावरून गळती होत आहे आणि पावसात भिजू नये म्हणून मुलांना छत्री घेऊन वर्गात बसावं लागतं. या शाळेत सुमारे ६८ मुलं शिक्षण घेतात, ज्यांचं वय ५ ते १० वर्षे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९७२ मध्ये बांधलेल्या या शाळेत चार खोल्या आहेत, ज्या जीर्ण अवस्थेत आहेत. तीन खोल्यांमध्ये शिकवलं जातं आहे. 

जयंत गुप्ता म्हणाले की, तक्रारीनंतर बीडीओ साहेबांनी शाळेचे सर्वेक्षण केलं होतं, परंतु त्यानंतर कोणतंही काम झालं नाही. त्यांनी शाळेच्या बीडीओ आणि जिल्हा शाळा निरीक्षक (प्राथमिक) यांना शाळेच्या स्थितीबद्दल माहिती दिली, परंतु दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यांनी स्थानिक खासदार रचना बॅनर्जी यांनाही याबद्दल माहिती दिली. पांडुआ ब्लॉकच्या बीडीओ सेबंती बिस्वास म्हणाल्या की, शाळेची तक्रार राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे आणि आता आर्थिक मंजुरीची वाट पाहत आहे.

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिलं की, खराब झालेल्या छतासह शाळेत ६८ मुलांना पावसात बसण्यास भाग पाडलं जातं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे! पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या 'शिक्षण मॉडेल'चं हे दुःखद सत्य आहे. शालेय पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जात आहे, तो पैसा कुठे आहे? असा सवालही विचारला आहे. 
 

Web Title: amit malviya slams mamata banerjees over students holding umbrellas due to rainwater leaks in hooghly school watch video