अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 06:40 IST2026-04-14T06:39:21+5:302026-04-14T06:40:08+5:30
Iran War News:

अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
कैरो : इराणवर दबाव आणण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून अमेरिकेच्या नौदलाने सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून इराणच्या सर्व बंदरांची आणि किनारपट्टी भागांची लष्करी नाकाबंदी सुरू केली आहे. या निर्णयामुळे आखातात पुन्हा तणाव वाढला असून, इराणने पर्शियन आखात व ओमानच्या आखातातील सर्व बंदरांवर जोरदार हल्ले केले जातील, अशी धमकी दिली आहे.
नाकाबंदी आणि लष्करी हालचाली
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार, ही नाकेबंदी सोमवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. इराणच्या बंदरांमध्ये जाणारी किंवा तिथून येणारी सर्व जहाजे, मग ती कोणत्याही देशाची असोत, त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. युद्धापूर्वी या मार्गावरून दिवसाला १३५ जहाजे जात होती, जी आता केवळ ४० वर आली आहेत. नाकेबंदीमुळे ही मर्यादित वाहतूकही थांबली आहे. मात्र, अन्य देशांच्या बंदरांदरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजांना सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या दोन विनाशिका या भागात तैनात केल्या आहेत. पण, इराणने हा दावा फेटाळला आहे.
होर्मुझमधील वाहतुकीत घट
सोमवारी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वर्दळ कमालीची कमी झालेली दिसून आली. 'लॉइड्स लिस्ट'नुसार, रविवारी रात्री सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती; परंतु, नंतर अमेरिकेने स्पष्ट केले की, नाकाबंदी संपूर्ण सामुद्रधुनीसाठी नसून केवळ इराणच्या बंदरांसाठी आहे. 'ऑरोरा' हा इराणशी संबंधित टँकर ओमानच्या आखातात दिसून आला होता. या जहाजावर अमेरिकेचे निर्बंध आहेत. 'न्यू फ्युचर' हे पेट्रोलियम उत्पादने वाहून नेणारे चिनी जहाज यशस्वीरीत्या सामुद्रधुनी पार करून गेले तर एक चिनी मालवाहू जहाज ओमानच्या आखातातून इराकमध्ये जाण्यासाठी सामुद्रधुनीच्या दिशेने जाताना दिसले. उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, १० मोठे इराणी टँकर्स ओमानच्या आखातात उभे आहेत. त्यांच्याकडे एकूण २१ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची क्षमता आहे.
ब्रिटनचा अमेरिकेच्या नाकाबंदी सहकार्यास नकार
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्पष्ट केले की, ब्रिटन या नाकेबंदीचा भाग बनणार नाही. "आम्ही या युद्धात ओढले जाऊ इच्छित नाही," असे त्यांनी म्हटले. युद्ध थांबल्यानंतरच ब्रिटन केवळ आखातातील पाणसुरुंग काढण्यासाठी मदत करू शकते, असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले.
फ्रान्स-ब्रिटनकडून शांतता मोहिमेसाठी पुढाकार
पॅरिस : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटनने शांततापूर्ण बहुराष्ट्रीय मोहिमेची तयारी सुरू केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी हॉर्मुझमधून मुक्त आणि विनाअडथळा वाहतूक सुरू करण्यासाठी फ्रान्स व ब्रिटन लवकरच एका परिषदेचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले.
२,२०० भारतीय नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परत
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत भारतीय दूतावासाने आतापर्यंत २,२०० पेक्षा जास्त नागरिकांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढले असून, यात तामिळनाडूतील मच्छिमार आणि विद्यार्थ्यांचा मोठा समावेश आहे. हवाई मार्ग बंद असल्याने आर्मेनिया व अझरबैजानमार्गे स्थलांतराचे पर्याय वापरत नागरिकांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले जात आहे.
'सध्याच्या स्वस्त पेट्रोल दरांचा आनंद घ्या'
तेहरान : नाकेबंदीवरून इराणने अमेरिकेला खोचक शब्दांत डिवचले आहे. "सध्याच्या इंधन दरांचा आनंद घ्या, लवकरच तुम्हाला ४-५ डॉलरचे पेट्रोलही स्वस्त वाटू लागेल," अशा शब्दांत इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेत सध्या पेट्रोलचे दर ४ ते ५ डॉलर प्रतिगॅलन आहेत. हे दर दुप्पट झाल्यास अमेरिकेला त्याची झळ बसेल असा इराणच्या वक्तव्याचा अर्थ आहे.
पोप लिओंनी शांततेचे आवाहन केल्याने संतप्त ट्रम्प म्हणाले, राजकारणापासून दूर राहा
युद्धातील अमेरिकेच्या भूमिकेवरून ट्रम्प आणि पोप लिओ चौदावे यांच्यात रविवारी अभूतपूर्व शाब्दिक युद्ध रंगले. पोप यांनी जगाला शांततेचं आवाहन करत 'सर्वशक्तिमान असल्याचा भ्रम' धोकादायक वळण घेत असल्याचे विधान केले. त्यावर ट्रम्प यांनी पोप हे 'परराष्ट्र धोरणात कच्चे' असून ते 'अति-उदारमतवादी' असल्याचा त्यांच्यावर आरोप केला.
'मला ट्रम्प प्रशासनाची अजिबात भीती वाटत नाही. माझे शांततेचे आवाहन बायबलमधील 'गॉस्पेल'वर आधारित आहे. राष्ट्राध्यक्षांना माझा संदेश समजला नसावा, पण चर्चचे काम जगात शांततेचे पूल बांधण्याचे आहे आणि ते मी करतच राहिलो आहे. युद्धखोर लोकांच्या प्रार्थना ईश्वर ऐकत नाही. ईश्वराचे नाव मृत्यूच्या संवादात ओढले जात आहे, पण खरी ताकद सेवा करण्यातच आहे. शक्ती प्रदर्शन खूप झाले, हे युद्ध थांबवा.
- पोप लिओ, चौदावे
पोप लिओ हे गुन्हेगारीच्या बाबतीत मवाळ आणि परराष्ट्र धोरणात अत्यंत कच्चे आहेत. ते माझ्या प्रशासनाच्या 'भीती'बद्दल बोलतात, पण कोविडच्या काळात जेव्हा चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या धर्मगुरूंना अटक केली जात होती, तेव्हाची भीती ते विसरले आहेत. मला असा पोप नकोय ज्याला इराणकडे अण्वस्त्र असणं मान्य आहे किंवा ज्याला आम्ही व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याबद्दल दुःख वाटतं. ते अमेरिकन असल्याने पोप आहेत.
-डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष अमेरिका
अमेरिकेला कितपत यश येईल?
अमेरिकेचे इराणच्या समुद्रावर पूर्ण वर्चस्व असेल तर नाकाबंदीला यश मिळू शकते. मात्र, इराणकडे गनिमी काव्याने लढण्याची मोठी क्षमता आहे.
सुरुंग : इराणने हॉर्मुझच्या अरुंद मार्गात पेरलेले सुरुंग काढणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
झुंडीने हल्ले : क्षेपणास्त्रे वाहून नेणाऱ्या शेकडो लहान बोटी एकाच वेळी हल्ला करू शकतात.
ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे : जमिनीवरून डागली जाणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अमेरिकी जहाजांना लक्ष्य करू शकतात.
विमानविरोधी क्षेपणास्त्रे : खांद्यावरून डागली जाणारी क्षेपणास्त्रे अमेरिकी हवाई दलासाठी धोकादायक आहेत.