पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:40 IST2026-04-14T07:40:19+5:302026-04-14T07:40:33+5:30
Crime News: दादरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची त्याच्या पत्नीच्या डोळ्यांसमोर दहा जणांच्या टोळक्याने भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवत सहा जणांना अटक केली आहे.

पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
मुंबई - दादरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची त्याच्या पत्नीच्या डोळ्यांसमोर दहा जणांच्या टोळक्याने भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवत सहा जणांना अटक केली आहे.
अंकुश आंबोकर (४०) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मित्राला भेटण्यासाठी निघाला असताना आरोपी गौरव सणसने त्याला अडविले. गौरव व त्याच्या साथीदारांनी अंकुशला शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. याबाबत कळताच सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अंकुशच्या पत्नीने घटनास्थळी धाव घेतली. तिने व काही जणांनी अंकुशला वाचविण्याचा प्रयत्न केला. गर्दी वाढल्याने गौरव व त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंकुशला केईएम रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
नेमका वाद काय?
अंकुश व हत्येतील प्रमुख आरोपी गौरव सणस हे पूर्वी बेंजोचा व्यवसाय करीत होते. वाद झाल्याने त्यांनी २०१७ मध्ये स्वतंत्र व्यवसाय सुरू केले. त्यामुळे गौरवचा अंकुशवर राग होता. गौरव अंकुशला सतत टोमणे मारत धमकावत असल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. तसेच, यापूर्वीही आरोपींनी अंकुशला मारहाण केली होती. याबाबत दादर पोलिस ठाण्यात वेळोवेळी तक्रारीही करण्यात आल्या होत्या.