नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 07:52 IST2025-08-11T07:46:10+5:302025-08-11T07:52:02+5:30
तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे.

नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर, विमानात तांत्रिक बिघाड असण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. यातच आता रविवारी संध्याकाळी तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट 'फ्लाइटराडार२४'च्या माहितीनुसार, एअर इंडिया या विमान कंपनीचे एअरबस ए३२० प्रकारातील विमान क्रमांक एआय२४५५ दोन तासांहून अधिक काळ हवेतच घिरट्या घालत होते.
१० ऑगस्ट रोजी तिरुअनंतपुरमहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या एआय २४५५च्या कर्मचाऱ्यांना विमानात संशयास्पद तांत्रिक बिघाड जाणवला. याशिवाय खराब हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमान चेन्नईकडे वळवण्यात आले, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.
विमानात होते ५ खासदार
एअर इंडियाच्या या विमानात पाच खासदारांसह अनेक प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. एअर इंडियाने माहिती देताना सांगितले की, हे विमान चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले. तिरुअनंतपुरमहून उड्डाण केलेल्या फ्लाइट क्रमांक एआय २४५५मध्ये केरळचे चार खासदार काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल, यूडीएफचे संयोजक अदूर प्रकाश, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कोडिकुनिल सुरेश आणि के. राधाकृष्णन, तामिळनाडूचे खासदार रॉबर्ट ब्रूस प्रवास करत होते.
Air India flight AI 2455 from Trivandrum to Delhi - carrying myself, several MPs, and hundreds of passengers - came frighteningly close to tragedy today.
— K C Venugopal (@kcvenugopalmp) August 10, 2025
What began as a delayed departure turned into a harrowing journey. Shortly after take-off, we were hit by unprecedented…
मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावलो!
लँडिंगनंतर, वेणुगोपाल यांनी 'मोठ्या अपघातापासून थोडक्यात बचावलो' असे म्हटले. त्यांनी असा दावा केला की, विमानात रडारची समस्या होती, ज्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंगपूर्वी आम्ही सुमारे एक तास १० मिनिटे हवेत होतो. ते म्हणाले की, मी या प्रकरणाची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालकांना (DGCA) आधीच दिली आहे.
एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान चेन्नईमध्ये सुरक्षितपणे उतरले असून, आता त्याची आवश्यक तपासणी केली जाईल. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले आणि झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला. 'फ्लाइटराडार२४'वरून मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने तिरुवनंतपुरमहून रात्री ८ नंतर उड्डाण केले आणि रात्री १०.३५ वाजता ते चेन्नईला पोहोचले.