अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 07:58 IST2025-10-09T07:50:12+5:302025-10-09T07:58:57+5:30
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मुत्ताकी यांना ९ ते १६ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्याची परवानगी दिली आहे.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
नवी दिल्ली - तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वी भारत एका द्विधा मनस्थितीत अडकला आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत जेव्हा मुत्ताकी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटणार तेव्हा तालिबानी झेंडा भारतीय झेंड्यासोबत फडकवण्याची परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताने अद्याप तालिबान शासित अफगाणिस्तानला अधिकृत मान्यता दिली नाही. त्यामुळे भारताने अफगाणिस्तान दूतावास कार्यालयात तालिबानला त्यांचा झेंडा फडकवण्याची परवानगी दिली नाही. आजही तिथे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या नेतृत्वातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानला झेंडा फडकवला जातो. आतापर्यंत हाच नियम चालत आला आहे.
परंतु, आता तालिबान शासित अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी एस जयशंकर यांना भेटणार आहेत. राजनैतिक नियमांनुसार, दोन्ही देशांचे ध्वज भेट देणाऱ्या मंत्र्यांच्या टेबलावर किंवा मागे ठेवले जातात. भारत तालिबानला मान्यता देत नसल्याने या असामान्य परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याचा विचार अधिकारी करत आहेत. याआधी जेव्हा भारतीय अधिकारी आणि मुत्ताकी यांची काबुलमध्ये भेट झाली होती तेव्हा तालिबानी झेंडा मागील बाजूस ठेवला होता. जानेवारीत दुबईत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि मुत्ताकी यांची भेट झाली तेव्हाही भारतीय अधिकाऱ्यांनी ही वेळ साधून नेली होती. त्यावेळी ना भारतीय तिरंगा, ना तालिबानी झेंडा फडकवण्यात आला होता. मात्र आता ही भेट दिल्लीत होणार आहे त्यामुळे या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मुत्ताकी यांना ९ ते १६ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्याची परवानगी दिली आहे. मुत्ताकी हे संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध घातलेल्या व्यक्तींच्या यादीत आहेत. जे तालिबानी नेत्यांवर लागू होते. त्यामुळे मुत्ताकी यांना भारत दौऱ्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागली आहे. सप्टेंबर महिन्यात हा नियोजित दौरा होता परंतु त्यावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने परवानगी दिली नव्हती. या आठवड्यात त्यांच्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
रशियानं दिली तालिबानला मान्यता
काही महिन्यांपूर्वी तालिबानला मान्यता देणारा रशिया पहिला देश बनला आहे. चीन आणि पाकिस्तानसह इतर अनेक देशांच्या राजधान्यांमध्ये तालिबानचे राजदूत आहेत, परंतु त्यांनी या देशाला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि अफगाणिस्तानातील रशियाचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांच्यात काबूलमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली होती. भारतानेही अद्याप तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नसली तरी, दोन्ही देशांमधील संबंध दिवसेंदिवस चांगले होत आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वैर सर्वश्रृत आहे. तालिबान अधिक मजबूत झाला, तर पाकिस्तानचा प्रादेशिक प्रभाव कमकुवत होऊ शकतो त्यामुळे आगामी काळात भारत तालिबानला अधिकृत मान्यता देणार का हे पाहणे गरजेचे आहे.