'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:56 IST2026-01-11T14:54:37+5:302026-01-11T14:56:42+5:30
मोदी सरकारने एक्सवरील आक्षेपार्ह मजकुराची गांभीर दखल घेतल्यानंतर, कंपनीने तब्बल ३,५०० पोस्ट ब्लॉक केल्या. तसेच ६०० हून अधिक अकाउंट्स देखील डिलीट केले आहेत.

'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'चे मालक इलॉन मस्क यांनी कंटेंटसंदर्भातील आपली चूक मान्य करत, यापुढे भारतीय कायद्यांनुसारच काम करण्याचे आश्वासन दिले आहे. खरे तर, 'एक्स'वरील आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात मोदी सरकारने गंभीर दखल घेतल्यानंतर, कंपनीने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर संबंधित मजकूर ब्लॉक केला.
मोदी सरकारने एक्सवरील आक्षेपार्ह मजकुराची गांभीर दखल घेतल्यानंतर, कंपनीने तब्बल ३,५०० पोस्ट ब्लॉक केल्या. तसेच ६०० हून अधिक अकाउंट्स देखील डिलीट केले आहेत. तत्पूर्वी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'एक्स'वरील आक्षेपार्ह कंटेन्टसंदर्भात इशारा दिला होता. यानंतर, अवघ्या एका आठवड्यातच ही कारवाई करण्यात आली. तसेच कंपनी, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करेल, असेही कंपनीने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'एक्स'वर फिरणाऱ्या अश्लील मजकुरासंदर्भात वाद सुरू आहे. अनेक युजर्स 'ग्रोक एआय'च्या सहाय्याने अशा प्रकारचा मजकूर तयार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. लोक यावर टीकाही करत आहेत.
नेमकं कप्रकरण काय? -
'ग्रोक' हे एलॉन मस्क यांच्या 'xAI' कंपनीने विकसित केलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे. युजर्स याचा वापर 'एक्स' प्लॅटफॉर्मवर अथवा ॲप डाऊनलोड करूनही करू शकतात. मात्र, सध्या ग्रोकच्या इमेज जनरेशन आणि एडिटिंग फिचरचा गैरवापर वाढल्याने, मोठा गोंधळ उडाला आहे. याच्या सहाय्याने महिला आणि अल्पवयीन मुलांचे फोटो वापरून अश्लील कंटेंट तयार केला जात होता. यासंदर्भात मोदी सरकारने आक्रमक भूमिका घेत, 'एक्स'ला कठोर निर्देश दिले होते. यानंतर, एक्स अथवा मस्क यांनी ही कारवाई केली.