सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हातातोंडाशी आलेली तब्बल २२ लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी तरुणाला गमवावी लागल्याची घटना सध्या चर्चेत आहे. याबाबत स्वतः कंपनीच्या मालकांनीच माहिती दिली आहे. या तरुणाने सोशल मीडियावर अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या, ज्या काही धार्मिक समुदायांबाबत अपमानकारक होत्या, असे त्या तरुणाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीच्या मालकाने सांगितले आहे. या तरुणाने आपली मेहनत आणि चिकाटीने कंपनीला प्रभावित केले होते. मात्र सोशल मीडियावर केलेली एक चूक त्याला महागात पडली.
याबाबत माहिती देताना Jobbie चे मालक मोहम्मद अहमद भाटी यांनी लिंक्डइनवर लिहिले की, आम्ही काही समुदायांबाबत केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांमुळे सदर तरुणाला दिलेलं ऑफर लेटर रद्द केलं आहे. Reddit वर आम्ही ४५० मुलाखतीनंतर कुणाचीही निवड केली नसल्याची आमची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या तरुणाने आमच्याशी संपर्क साधला होता. तसेच नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याची मुलाखत सकारात्मक वाटल्याने आम्ही त्याची निवड केली. तसेच त्याला वार्षिक २२ लाख रुपये एवढं वेतन निश्चित केलं. मात्र या तरुणाची पार्श्वभूमी तपासल्यावर आम्हाला धक्का बसला.
यामध्ये या तरुणाने लिंक्डइनवर काही समुदायांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर या तरुणाला दिलेलं ऑफर लेटर रद्द करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. आता यावर समाज माध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.