पाच वर्षांत IIT मधील ६५ विद्यार्थ्यांची आत्महत्या; कानपूरमध्ये ९, मुंबईत एकाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:02 IST2026-01-22T10:01:57+5:302026-01-22T10:02:51+5:30
संचालकांना जबाबदार धरण्याची मागणी

पाच वर्षांत IIT मधील ६५ विद्यार्थ्यांची आत्महत्या; कानपूरमध्ये ९, मुंबईत एकाने संपवले जीवन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशातील आयआयटीमध्ये पाच वर्षांत ६५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांतच सुमारे ३० विद्यार्थ्यांनी स्वत:चे जीवन संपविले असून, त्यात आयआयटी कानपूरमध्ये सर्वाधिक ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयआयटी खरगपूरमध्ये ७ आत्महत्या झाल्या आहेत. २ वर्षांत आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने स्वत:ला संपविले. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कानपूरचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल आयआयटी ॲल्युमनी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंग यांनी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या आत्महत्यांच्या अभ्यासातून ही बाब समोर आली. कानपूरमध्ये मंगळवारी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला.
संचालकांना जबाबदार धरण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने कलम २१ अंतर्गत मानसिक आरोग्य हा जगण्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग म्हटले आहे. तसेच, ‘साहा विरुद्ध आंध्र प्रदेश’ खटल्यात न्यायालयाने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ही घटनात्मक आणि संस्थात्मक जबाबदारी मानली जावी, असे धीरज सिंग यांनी नमूद केले.
आयआयटी कानपूर कॅम्पसमध्ये ही नववी आत्महत्या असल्याने, शिक्षण मंत्रालयाने तेथील संचालकांना जबाबदार धरावे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी नवीन प्रमुखांची नियुक्ती करण्याचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कानपूरमध्ये सर्वाधिक घटना
गेल्या २ वर्षांत देशातील आयआयटीमध्ये ३० आत्महत्या झाल्या आहेत. यातील ९ म्हणजेच जवळपास ३० टक्के आत्महत्या एकट्या आयआयटी कानपूरमध्ये झाल्या. देशातील २३ आयआयटींपैकी हा सर्वाधिक आकडा आहे. तर आयआयटी मुंबईमध्ये १ आत्महत्या झाली. एकीकडे आयआयटी मुंबईमध्ये जास्त विद्यार्थी असताना हे प्रमाण कमी आहे. आयआयटी कानपूरमध्ये हे प्रमाण अधिक आहे. यामागे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त शैक्षणिक ताण हे आहे. तसेच आयआयटी कानपूरमधील मानसिक आरोग्याच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे सिंग यांनी सांगितले.