४३ टक्के दिव्यांग विद्यार्थी शिक्षण सोडण्याच्या मन:स्थितीत; ऑनलाईन शिक्षणात रोज येतात अनेक समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 23:19 IST2020-07-18T23:18:17+5:302020-07-18T23:19:19+5:30
सर्वेक्षणानुसार ५६.५ टक्के दिव्यांग मुलांना रोज अनेक अडचणी येत आहेत.

४३ टक्के दिव्यांग विद्यार्थी शिक्षण सोडण्याच्या मन:स्थितीत; ऑनलाईन शिक्षणात रोज येतात अनेक समस्या
नवी दिल्ली : ऑनलाईन शिक्षणातील समस्यांमुळे जवळपास ४३ टक्के दिव्यांग मुले शिक्षण सोडण्याचा विचार करीत आहेत, असा दावा एका सर्वेक्षणातील निष्कर्षात करण्यात आला आहे. दिव्यांगासाठी काम करणाऱ्या ‘स्वाभिमान’ स्वयंसेवी संघटनेने मे महिन्यात ओडिशा, झारखंड, मध्यप्रदेश, त्रिपुरा, चेन्नई, सिक्कीम, नागालँड, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये हे सर्वेक्षण केले. यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसह एकूण ३,६२७ लोकांनी भाग घेतला.
सर्वेक्षणानुसार ५६.५ टक्के दिव्यांग मुलांना रोज अनेक अडचणी येत आहेत, तर ७७ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, दूरस्थ शिक्षण पद्धतच माहीत नसल्याने अभ्यासच करता आला नाही. ५६.४८ टक्के विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवला आहे. तथापि, ४३.५२ टक्के विद्यार्थी शिक्षणच सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत. ६४ टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर नाही, असे शिक्षकांनी सांगितले.
६७ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, आॅनलाईन शिक्षणासाठी टॅब किंवा कॉम्प्युटर आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी डाटा/वायफायची आवश्यक आहे, असे ७४ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. ७१ टक्के विद्यार्थ्यांना याची आवश्यकता वाटत नाही.
धोरणात्मक बदल करण्याची गरज
च्सर्वेक्षणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालात कोविड-१९ जगव्यापी साथीच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक बदल आणि आवश्यक संशोधनाची शिफारस केली आहे.
च्स्वाभिमानच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रुती महापात्रा यांचे असे म्हणणे आहे की, सर्व दिव्यांग मुलांना एकाच गटात ठेवता येऊ शकत नाही. कारण त्यांच्यातील शारीरिक अक्षमता वेगवेगळ्या असतात, तसेच त्यांच्या गरजाही वेगळ्या असतात.
च्कोरोनाच्या साथीमुळे दिव्यांग विद्यार्थी मागे राहू शकतात. वेळीच पावले उचलण्यात आली नाहीत, तर ते शिक्षण आणि जीवन जगण्याच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात.